...आम्ही आघाडी सैनिक नव्हे, शिवसैनिक...म्हणाला 'हा'नेता - Shivsena EX MP Anant Gite addresses Party Workers | Politics Marathi News - Sarkarnama

...आम्ही आघाडी सैनिक नव्हे, शिवसैनिक...म्हणाला 'हा'नेता

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

राज्यातील तीन पक्षांचे आघाडी सरकार असल्यामुळे आपण नेमके कुणाशी लढायचे, असा प्रश्न सर्वांसमोरच आहे. शिवसैनिकांमध्ये काहीशी संभ्रमावस्था आहे. ती दूर करण्यासाठी मी आलो आहे. आपण आपली ताकद पुढील कोणत्याही निवडणुकांत स्वबळावर दाखविणे गरजेचे आहे, असे स्पष्ट प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार गीते यांनी केले.

गुहागर : राज्यातील तीन पक्षांचे आघाडी सरकार असल्यामुळे आपण नेमके कुणाशी लढायचे, असा प्रश्न सर्वांसमोरच आहे. शिवसैनिकांमध्ये काहीशी संभ्रमावस्था आहे. ती दूर करण्यासाठी मी आलो आहे. राज्यातील आघाडी सरकार केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत, असे स्पष्ट करून आपण शिवसैनिक आहोत, आघाडी सैनिक नाही, आपण आपली ताकद पुढील कोणत्याही निवडणुकांत स्वबळावर दाखविणे गरजेचे आहे, असे स्पष्ट प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार गीते यांनी केले.

गुहागर तालुक्‍यातील शृंगारतळी येथे पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नुकतीच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या वेळी मार्गदर्शन करताना गीते बोलत होते. भाषणाच्या सुरवातीला अनंत गीते यांनी कोरोना काळातील प्रसंगांचा उल्लेख करून याची भयानकता व घ्यावयाची काळजी, यावर मार्गदर्शन केले.

या वेळी जि. प. उपाध्यक्ष महेश नाटेकर, जि. प. सदस्या नेत्रा ठाकूर, गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत, उपतालुकाप्रमुख बाबू सावंत, चिपळूण तालुकाप्रमुख संदीप सावंत, पं. स. सदस्या पूर्वी निमूणकर, रवींद्र आंबेकर, शृंगारतळी शहरप्रमुख नरेश पवार, नारायण गुरव, पाटपन्हाळे सरपंच संजय पवार व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मी त्याच्या गावामध्ये मेळावे घेईन
गिते म्हणाले, शिवसेनेचा जो शाखाप्रमुख माझ्याकडे येईल आणि मला हा मेळावा माझ्या गावी घ्या सांगेल, त्याचवेळी मी त्याच्या गावामध्ये मेळावे घेईन. कुणावरही मेळाव्याची जबरदस्ती करणार नाही. प्रत्येक तालुक्‍यामध्ये मी मेळावे घेऊन प्रमुख कार्यकर्त्यांच्या मनामधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. या वेळी गीते यांनी आघाडी सरकारमधील कोणत्याही नेत्यावर भाष्य केले नाही.

राज्यात ३ हजार ३०० ग्रा. पं. ताब्यात
ग्रा. पं. निवडणुकांमध्ये कोठेही आघाडी झालेली मला पाहायला मिळालेली नाही. तसे मी स्वबळावर लढावे, असे आदेशही दिले होते. त्यामुळेच राज्यात ३ हजार ३०० इतक्‍या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती सेनेच्या ताब्यात आल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

ताकद पुढील कोणत्याही निवडणुकांत दाखवा
राजकीय भाष्य करताना ते म्हणाले, हे सरकार केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहे; मात्र, आपण शिवसैनिकच आहोत, आघाडी सैनिक नाही, आपण आपली ताकद पुढील कोणत्याही निवडणुकांत स्व: बळावर दाखविणे गरजेचे आहे, असेही श्री. गीते यांनी स्पष्ट केले.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख