Shivsena Demands Fast Track Court Hearing Against Nitesh Rane | Sarkarnama

नितेश राणेंविरुद्धचा 'चिखलफेक' खटला जलदगती न्यायालयात चालवा : शिवसेना

सरकारनामा ब्युरो
रविवार, 5 जुलै 2020

राष्ट्रीय महामार्गाचे तत्कालीन उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गेल्या वर्षी चार जुलैला 'स्वाभिमान' च्या कार्यकर्त्यांनी कणकवली येथे भरपावसात चिखलाने आंघोळ घातली होती. त्यानंतर पोलिसांनी नितेश राणे यांना अटक करुन त्यांच्यावर खटला दाखल केला होता. 

कणकवली : राष्ट्रीय महामार्गाचे तत्कालीन उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे व अन्य संशयितांवर दाखल केलेला खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी जिल्हा शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. 

याबाबतचे पत्र शिवसेनेने प्रसिद्धीस दिले आहे. यावर जिल्हाप्रमुख संजय पडते, आमदार वैभव नाईक, जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या स्वाक्षरी आहेत. ''गतवर्षी ४ जुलै रोजी आमदार नीतेश राणे व त्यांच्या अन्य सहकारी कार्यकर्त्यांनी तत्कालीन उपअभियंता शेंडेकर यांना पुलावर दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर त्यांच्यावर चिखलफेक केली. याप्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शासकीय सेवेत कर्तव्यात असलेल्या एका अधिकाऱ्यावर अशाप्रकारे अमानुषपणे चिखलफेक करणे योग्य नाही. शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करून सर्वत्र दहशत माजवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालून संबंधित अधिकाऱ्यांना न्याय द्यावा. शिवाय दोषींना कडक शिक्षा व्हावी,'' अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

शेडेकर यांना गेल्या वर्षी चार जुलैला 'स्वाभिमान' च्या कार्यकर्त्यांनी कणकवली येथे भरपावसात चिखलाने आंघोळ घातली होती. त्यानंतर पोलिसांनी नितेश राणे यांना अटक करुन त्यांच्यावर खटला दाखल केला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख