सेना - भाजपमधील निधीवाटपाचा वाद 'व्हॉट्‌सऍप'वर - Shivsena And BJP in Mumbai Fighting for Development Funds | Politics Marathi News - Sarkarnama

सेना - भाजपमधील निधीवाटपाचा वाद 'व्हॉट्‌सऍप'वर

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

शिवसेना-भाजपमध्ये असमान निधीवाटपावरून सुरू असलेला वाद आता 'व्हॉट्‌सऍप'वर पोहचला आहे. असमान निधीवाटपाचा प्रकार उघड केला म्हणून स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी व्हॉट्‌सऍपवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केला

मुंबई  : शिवसेना-भाजपमध्ये असमान निधीवाटपावरून सुरू असलेला वाद आता 'व्हॉट्‌सऍप'वर पोहचला आहे. असमान निधीवाटपाचा प्रकार उघड केला म्हणून स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी व्हॉट्‌सऍपवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केला; तर हे आरोप फेटाळत कोणतीही धमकी दिलेली नसून बोगस व्हॉट्‌सऍप मेसेज दाखवून भाजप नाहक आरोप करत आहेत, असे प्रत्युत्तर जाधव यांनी दिले.

जाधव यांनी ते प्रतिनिधित्व करत असलेल्या प्रभागासाठी ३३ कोटी रुपयांच्या तरतुदी केल्या आहेत. यात खाद्य-भाजी ट्रकसाठी पाच कोटी, ज्यूटच्या पिशव्यांसाठी दीड कोटी, व्यायामशाळा साहित्यासाठी दीड कोटी अशा अवाजवी तरतुदी करून ठेवल्या आहेत. ज्यूटच्या पिशव्यांची खरेदीही बाजारभावाच्या अनेक पटीने करण्यात येत आहे, असा आरोप मिश्रा यांनी केला. हा प्रकार उघड केला म्हणून व्हॉट्‌सऍपवर अर्वाच्च भाषेत मेसेज पाठवून जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप मिश्रा यांनी केला. 

मिश्रा यांनी यातील काही मेसेजही व्हायरल केले. याला यशवंत जाधव यांनी तत्काळ प्रत्युत्तर दिले. असे कोणतेही मेसेज आपण पाठवले नाहीत, हे आरोप करताना ते कोणत्या मोबाईल नंबरवरून आले तेही दाखवणे गरजेचे होते; मात्र केवळ दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे. जाधव यांनी मिश्रा यांच्यावर खिचडी घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे, असा दावाही मिश्रा यांनी केला. यावर मिश्रा यांनी जाधव यांनी व्हॉट्‌सऍपवर पत्र पाठवून याबाबत खुलासा करण्याची मागणी केली; मात्र त्यावर जाधव यांनी अर्वाच्च भाषेत उत्तर देत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही मिश्रा यांनी केला.

जाधव यांनी नियमबाह्य निधी मिळवला आहे. चढ्या दराने आता खरेदी सुरू आहे. याबाबत महालेखापरीक्षकांकडे (कॅग) तक्रार केली आहे. जाधव यांनी केलेल्या खिचडी घोटाळ्याच्या आरोपांचे ते पुरावे देऊ शकत नाही. आता त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार आहे.
- विनोद मिश्रा, भाजप, नगरसेवक

सर्व कामे नियमानुसार सुरू आहेत. यात कोणताही गैरप्रकार झाला नाही. जर मिश्रा यांना संशय असेल तर त्यांनी चौकशीची मागणी करावी. आमचा त्याला पाठिंबा असेल. हा फक्त बदनाम करण्याचा प्रकार आहे. व्हॉट्‌सऍपवर कोणतेही मेसेज मिश्रा यांना पाठवलेले नाहीत.
- यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख