किरीट सोमय्या यांच्या आरोपांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ  - Shiv Sena style answer to Kirit Somaiya's allegations: Anil Parab | Politics Marathi News - Sarkarnama

किरीट सोमय्या यांच्या आरोपांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

आम्ही जे काही आरोप करू, त्याला उत्तरे देण्याची तयारी त्यांनी दाखवावी. 

पुणे : "मला असं वाटतंय की सध्या दिवाळी सुरू आहे. हे दिवाळीचे दोन-चार दिवस जाऊद्यात. मग, त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या सर्व आरोपांना जे काही उत्तर द्यायचं आहे, ते एकाच वेळी देऊ. तोपर्यंत सोमय्या यांना जेवढे आरोप करायचे आहेत, ते करूद्यात. प्रत्येक आरोपाची चिरफाड शिवसेना आपल्या पद्धतीने करेल,' असा इशारा शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमय्या यांना दिला. 

अन्वय नाईक आणि ठाकरे परिवारात तीन हजार कोटींचा जमीन गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच दहीसर भूखंड गैरव्यवहाराबाबत आमच्याकडे कागदपत्रे, पुरावे असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. हिम्मत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी यावर बोलावे, असे आवाहनही सोमय्या यांनी दिले. 

परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हाडाची जमीन लाटली, असा आरोपही किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनिल परब यांच्यावर कारवाई करणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. त्याला मंत्री परब यांनी उत्तर दिले आहे. 

परब म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी आत्तापर्यंत केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य आढळून आलेले नाही. सोमय्या यांची आरोपांची मालिका एकदा पूर्ण होऊद्या. मग त्याच्यावर आम्ही सविस्तर उत्तर देऊ आणि आम्ही जे काही आरोप करू, त्याला उत्तरे देण्याची तयारी त्यांनी दाखवावी. 

किरीट सोमय्या हे जे सध्या आरोप करत आहेत, त्याला कुठलाही आधार नाही. आता ते जे काही आरोप करत आहेत, त्याला यापूर्वीच उत्तरे देण्यात आलेली आहेत आणि ते सर्व आरोप त्यावेळीच बिनबुडाचे ठरलेले आहेत. किरीट सोमय्या यांच्याकडून शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप परब यांनी या वेळी केला. 

...तर शिवसेनेने न्यायालयात जावे : चंद्रकांत पाटील 

चंद्रकांत पाटील यांनीही किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांबाबत भाष्य केले. रश्‍मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यातील जमीन व्यवहार प्रकरण हे जाणीवपूर्वक समोर ठेऊन अर्णव गोस्वामी प्रकरणावरील लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला जातोय का? या प्रश्नावर पाटील म्हणाले, ""किरीट सोमय्या यांनी ठोस कागदपत्रे बाहेर काढली आहेत. ती खोटी वाटत असतील, तर शिवसेनेने न्यायालयात जावे.' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख