महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही, या रागातूनच ईडीची कारवाई : शरद पवार  - Sharad Pawar's criticism of BJP over ED's action | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही, या रागातूनच ईडीची कारवाई : शरद पवार 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

एवढं मोठं संकट आले असताना इतकं शूद्र राजकारण करणं, योग्य नाही.

मुंबई : "लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांच्या विरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही, या रागातून ईडीची कारवाई करण्यात आली आहे,' असा गंभीर आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला. 

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर सक्तवसुली संचानलयाकडून (ईडी) करण्यात आलेल्या कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला. भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी आज (ता. 24 नोव्हेंबर) पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. 

शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात आज जे सरकार आहे, त्याला सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळतो आहे, त्यामुळे विरोधकाचं नैराश्‍य वाढलं आहे, त्यातून हे ईडीसारख्या संस्थेकडून कारवाई केली जात आहे. महाराष्ट्रात आपल्याला पुन्हा सत्ता मिळत नाही, ते पाहून रोष व्यक्त करत आहेत. सत्तेचा गैरवापर करण्याची ही पद्धत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

सत्ता गेल्यावर किती त्रास होतो आहे, हे आज आपण महाराष्ट्रात पाहत आहोत. काही जण उद्वेगातून काहीही बोलत आहेत. माणसाने आशा ठेवावी, त्यात वाद नाही. मागे म्हटले होते, मी पुन्हा येईन, ठीक आहे. लोकं लक्षात ठेवतात आणि खबरदारी घेतात, अशी कोपरखळीही पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारली. 

राज्यातील मंदिरं उघडण्याबाबत भारतीय जनता पक्षाने जे केलं. त्याबाबत विचारले असता, "एवढं मोठं संकट आले असताना इतकं शूद्र राजकारण करणं, योग्य नाही,' अशा शब्दांत शरद पवारांनी भाजपला फटकारले. 

कोविड लस निर्मितीत प्रगती आहे. याबाबत माझी सिरम या संस्थेच्या प्रमुखांशी चर्चा झाली आहे. रास्त किंमतीने लस उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना मी त्यांना केली आहे आणि मला आनंद आहे की त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, असे भाष्य पवार यांनी कोविड लसीच्या निर्मितीबाबत केले. 

ज्यांना (चंद्रकांत पाटील) लोक गांभीर्याने घेतात, त्यांच्याविषयी प्रश्न विचारा, असे चंद्रकांत पाटील यांच्याबाबत विचारण्यात आलेल्या एका प्रश्‍नावर शरद पवार म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख