Sharad Pawar donates 100 computers to storm-hit colleges | Sarkarnama

शरद पवार यांच्याकडून वादळग्रस्त महाविद्यालयांना 100 संगणक

तेजस वाघमारे 
सोमवार, 6 जुलै 2020

विद्यापीठाकडून मदतीची प्रतीक्षा असताना असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेज (मुंबई) या संघटनेने वादळग्रस्त महाविद्यालये पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

मुंबई : कोकणातील निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा मोठ्या प्रमाणात रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना बसला. सुमारे 16 महाविद्यालयांचे अतोनात नुकसान झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या महाविद्यालयांना 100 संगणक देणार आहेत. 

अनेक महाविद्यालयांनी पंखे, कपाटे, खुर्च्या अशा वस्तू विनाअनुदानित महाविद्यालय संघटनेकडे दिल्या आहेत; त्या लवकरच वादळग्रस्त महाविद्यालयांना पोहोचण्यात येणार आहेत.

रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील घरे, शाळा, महाविद्यालयांना निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. या भागांतील महाविद्यालयांचे नेमके किती नुकसान झाले आहे, याची पाहणी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य, सरकारी अधिकारी व प्राचार्यांनी विशेष दौरा केला. महाविद्यालयांमधील संगणक, खुर्च्या, टेबल, पंखे आदी अनेक वस्तूंचे नुकसान झाल्यामुळे विद्यापीठाने शक्‍य ती मदत देण्याचे आश्‍वासन दिले. 

विद्यापीठाकडून मदतीची प्रतीक्षा असताना असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेज (मुंबई) या संघटनेने वादळग्रस्त महाविद्यालये पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार संघटनेने महाविद्यालयांचे संस्थाचालक, प्राचार्यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याचप्रमाणे संघटनेने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही मदतीसाठी विनंती केली होती. 

या विनंतीनुसार पवार या वादळग्रस्त महाविद्यालयांना 100 संगणक देणार आहेत. इतर संस्थाचालकांनी पंखे, खुर्च्या, ग्रंथालयांसाठी कपाटे, ट्यूबलाईट, प्रिंटर, फळे आदी साहित्य संघटनेला दिले आहे. हे साहित्य लवकरच संबंधित महाविद्यालयांना पोहोचवण्यात येणार आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे महाविद्यालयांचे अतोनात नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी आम्ही सढळ हस्ते मदत करत आहोत. अनेक संस्थाचालकांनी मोठी मदत केली आहे. त्यांनी दिलेले साहित्य आम्ही वादळग्रस्त महाविद्यालयांना देणार आहोत. त्याबरोबरच शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने संगणकांची मदत केली आहे.
- डॉ. तुकाराम शिवारे, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेजेस, मुंबई.

वादळाचा सर्वाधिक फटका यांना
- तिकमबाई मेहता महाविद्यालय (माणगाव)
- दोशी वकील महाविद्यालय (गोरेगाव)
- लोकनेता गोपीनाथ मुंडे महाविद्यालय (मंडणगड)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख