अर्णब गोस्वामींना विधीमंडळाकडून 'स्मरणपत्र'; उत्तर न दिल्यास कारवाई होणार - Second Notice sent to Republican TV Editor Arnab Goswami | Politics Marathi News - Sarkarnama

अर्णब गोस्वामींना विधीमंडळाकडून 'स्मरणपत्र'; उत्तर न दिल्यास कारवाई होणार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

रिपब्लिक चॅनेलचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेने पाठवलेल्या हक्कभंग नोटीसला उत्तर न पाठवल्याने त्यांना पुन्हा एकदा स्मरणपत्र पाठवण्यात आले आहे असे समजते

मुंबई : रिपब्लिक चॅनेलचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेने पाठवलेल्या हक्कभंग नोटीसला उत्तर न पाठवल्याने त्यांना पुन्हा एकदा स्मरणपत्र पाठवण्यात आले आहे असे समजते.५ अॉक्टोबरपर्यंत उत्तर द्या असे सांगितले असतानाही गोस्वामी यांनी कोणतीही हालचाल केली नसल्याने २० औक्टोबरपर्यंत त्यांनी उत्तर न पाठवल्यास योग्य ती कारवाई केली जाईल असे कळवण्यात आले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री व विधीमंडळाचा अवमान केल्याबद्दल अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात  8 सप्टेंबर रोजी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अनेक सदस्य, अनेक मंत्री यांच्या विरोधात एकेरी शब्दांचा उल्लेख करुन लोकशाहीची थट्टा चालवली आहे. टीआरपीसाठी हे चालले आहे. यापूर्वी असे कधी घडले नव्हते. यापूर्वी चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना मानाचे स्थान असायचे. गोस्वामी यांनी आक्षेपार्ह व हेतुपुरस्सर विधाने केली आहेत. त्यांचा मी निषेध करतो, असे सांगत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्वाव मांडला होता. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य मंत्र्यांबाबत गोस्वामी त्यांच्या वृत्तवाहिनीवर आधारहीन मत मांडून विधिमंडळाचा अवमान करीत आहे, असा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत अर्णब यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी हे सरकारविरुद्ध आक्रमक झाले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेते संतप्त झाले होते. 

दरम्यान, बनावट टीआपपी प्रकरणात अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. टीव्ही वाहिन्यांचा टीआरपी 'बीएआरसी' नावाची संस्था ठरवत असते. 'बीएआरसी'ने हे कंत्राट हंसा या संस्थेला दिले होते. मात्र, हंसा कंपनीतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या तीन वाहिन्यांनी हा गैरप्रकार केल्याचे उघड झाले. त्यात रिपब्लिक टीव्हीचाही सहभाग असल्याचा मुंबई पोलिसांचा आरोप आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख