एका भगिनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही : राऊतांची सोमय्यांवर कडवट टीका  - Sanjay Raut's harsh criticism of Kirit Somaiya | Politics Marathi News - Sarkarnama

एका भगिनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही : राऊतांची सोमय्यांवर कडवट टीका 

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

शेठजी, जरा जपून!'

मुंबई : "अन्वय नाईक यांच्याशी 21 व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. एका भगिनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहाराबाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्याबाबत आहे. शेठजी, जरा जपून!' अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला केला आहे. 

गेली दोन दिवसांपासून सोमय्या हे ठाकरे परिवारांवर जमीन खरेदीवरून टीका करत आहेत. अन्वय नाईक यांच्याकडून रश्‍मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांनी जमीन खरेदी केल्याचा आरोप केला होता. ती जमीन कशासाठी खरेदी केली आहे, असा सवाल त्यांनी केला उपस्थित केला होता. 

दरम्यान, सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषदेत घेत उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात तब्बल 21 जमिनीचे व्यवहार झाल्याचा आरोप केला होता. अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांचे व्यवहार काय आहेत, हे जनतेसमोर आले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्याला अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनीही पत्रकार परिषद घेत उत्तर दिले होते. 

त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही ट्विट करत किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, एका भगिनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहाराबाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्याबाबत आहे. शेठजी, जरा जपून' असे म्हणत त्यांना एक प्रकारे इशाराच दिला आहे. 

किरीट सोमय्या काय म्हणाले होते? 

नाईक आणि ठाकरे परिवाराचे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार हे जनतेसमोर आले पाहिजेत. रश्‍मी ठाकरे आणि मनीषा वायकर आणि अन्वय नाईक यांनी एकत्र येणे म्हणजे काय? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी ठाकरेंचे जमीन व्यवहार आहेत का, असा प्रश्न जनता विचारत आहेत, असे सोमय्या म्हणाले होते. 

ठाकरे परिवाराने जमिनीमध्ये एवढी गुंतवणूक का व कशासाठी केली. दोन ते तीन व्यवहार झाले असते तर समजू शकतो. मात्र इथे 21 व्यवहार झाले आहेत, यांचा खुलासा उद्धव ठाकरे यांनी करावा, असे आवाहन सोमय्या यांनी केले. रवींद्र वायकर हे जमिनीचा व्यवसाय करणारे छोटेसे शिवसैनिक आहेत, त्यांचे व्यवहार हे आहेत, असे सोमय्या यांनी सांगितले. 

"अन्वय नाईक कुटुंबिय आणि रश्‍मी ठाकरे यांच्या एकत्रित जमिनी खरेदीत चौकशी करा," अशी मागणी सोमय्या यांनी काल पत्रकार परिषदेत केली होती. "पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळे आत्महत्या केलेले अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा आणि रश्‍मी ठाकरे, मनीषा वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्‍यात एकत्रित व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. हे व्यवहार प्रथमदर्शनी संशयास्पद वाटत आहे, त्याची चौकशी करावी,' अशी मागणी सौमय्या यांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. 

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या 2018 मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (ता. 4) महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक हे दोघे 2018 मध्ये अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

पोलिसांना त्यावेळी अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे 5 कोटी 40 लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. आता पुन्हा या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख