महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेची खरी कथा पडद्यामागेच राहिल : संजय राऊत

'आतापर्यंत ३६दिवसांच्या सत्तानाटय़ावर चार पुस्तके आली आहेत. मी यावर पुस्तक लिहिले तर आधीच्या चार पुस्तकांत जे ‘सत्य’ सांगितले त्यावर पाणी पडेल'' असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Sanjay Raut Shivsena MP
Sanjay Raut Shivsena MP

मुंबई : ''आतापर्यंत ३६ दिवसांच्या सत्तानाटय़ावर चार पुस्तके आली आहेत. मी यावर पुस्तक लिहिले तर आधीच्या चार पुस्तकांत जे ‘सत्य’ सांगितले त्यावर पाणी पडेल'' असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अमित शहांच्या घरातील मध्यरात्रीची बैठक आणि पवार व माझी एक्सप्रेस वेवरील चर्चा हे व अशा अनेक घटना म्हणजे महाराष्ट्रातील सरकार स्थापनेच्या नाट्याची पटकथा नव्हे. खरी पटकथा अद्याप पडद्यामागेच आहे व राहील!,'' अशी गुगली शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दैनिक 'सामना'मधील 'रोखठोक' या सदरात टाकली आहे. आजपासून वर्षभरापूर्वी सरकार स्थापनेच्या रणांगणावर माझ्या हातची तलवार तोकडीच होती, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सरकारची वर्षपूर्ती झाली आहे. त्याचा आढावा या सदरात घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सध्याचे अनैसर्गिक सरकार टिकणार नाही असे श्री. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील वगैरे नेते सांगतात. राजकारणात कुणी साधुसंत वगैरे नसतो. तसे कोणतेही सरकार हे नैसर्गिक किंवा अनैसर्गिक नसते. जोपर्यंत एखादे सरकार टिकून आहे तोपर्यंत ते नैसर्गिक न्यायाचेच असते. सध्याचे सरकार अस्थिर करण्यासाठी सी.बी.आय., ईडीसारख्या यंत्रणांचा वापर सुरू आहे. बेकायदेशीर बांधकाम, आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखे गुन्हे करणाऱयांना अभय दिले जात आहे. हे सर्व राजकीय दाबदबावाचे प्रकार न्यायाचे आणि नैसर्गिक तितकेच ‘ठाकरे सरकार’ही नैसर्गिक मानावेच लागेल, असे राऊत यांनी म्हटले आहे. 

सरकार स्थापनेच्या घडामोडींवर अनेक वावड्या उठल्या. राऊत यांनी त्याचाही समाचार आपल्या सदरात घेतला आहे......पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार, अमित शहा यांच्यात दिल्लीत बैठक झाली, अशीही एक चर्चा होती. त्याबाबत राऊत म्हणतात, ''श्री. पवार या काळात दिल्लीत असताना त्यांच्यात व माझ्यात उत्तम संवाद होता व जवळ जवळ रोजच आम्ही भेटत होतो. नक्की कोठे काय सुरू आहे याचे ‘अपडेटस्’ एकमेकांना देत होतो. भारतीय जनता पक्षाशी कोणतेही डील करण्याच्या मनःस्थितीत मला श्री. पवार दिसले नाहीत. ‘‘भाजपकडून सरकार बनविण्यासंदर्भात विविध स्तरांवरून ऑफर्स येत आहेत’’ हे त्यांचे सांगणे होते. ‘‘लवकरच पंतप्रधान मोदी यांना भेटून मी भाजपबरोबर सरकार स्थापन करणे शक्य नाही असे सांगणार आहे’’ हे त्यांनी मला सांगितले. याच काळात शेतकऱयांच्या प्रश्नांवर पवार मोदींना भेटायला गेले व महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत सांगायचे ते सांगून आले. त्यामुळे पवारांनी भाजपला शब्द दिला होता व त्यानुसार 'पहाटे'च्या हालचाली झाल्या हे खोटेच आहे. मोठे अपघात दुर्दैवाने पहाटे चालक साखरझोपेत असतानाच होतात!....असे राऊत यांनी म्हटले आहे. 

एका पुस्तकात असे लिहिले की, संजय राऊत व शरद पवार यांची गुप्त भेट मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झाली. मी पवारांची वाट पाहत ‘मॅकडोनाल्डस्’समोर गाडीत बसून होतो. नंतर पवारांची गाडी आली. मी त्यात बसलो व सरकार स्थापनेबाबतची चर्चा करत पवारांच्या गाडीतून पुण्यापर्यंत गेलो. हे कसे शक्य आहे? श्री. पवार यांना मी अनेक वर्षे उघडपणेच भेटतो आहे. निकाल लागत होते त्या दिवशीही मी त्यांच्या निवासस्थानी उघडपणे भेटलो. संपूर्ण मीडियाने ते दाखवले.... असेही राऊत यांनी म्हटले आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com