अस्तनीत निखारे असतातच.....संजय राऊत यांना रोख कुणावर? - Sanjay Raut Analyses Statement Made By Anil Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

अस्तनीत निखारे असतातच.....संजय राऊत यांना रोख कुणावर?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

काही पोलिस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, तो हाणून पाडला, असं व्यक्तव्य देशमुख यांनी  एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. त्यावर "काही पोलिस अधिकारी सरकार पाडणार होते, असे मी म्हणालो नाही. ते वक्तव्य खोटे आहे, माझ्या तोंडी 'ते' शब्द टाकण्यात आले," असा खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल केला होता. यावर 'सामना'मध्ये भाष्य करण्यात आले आहे

पुणे : ''राज्यातील काही बडे पोलीस अधिकारी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत होते किंवा आहेत असे एक विधान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या तोंडी घातले गेले. आता गृहमंत्र्यांनी जाहीर केले की, मी अशा प्रकारचे काही विधान केलेच नव्हते. राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्य़ांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न वेळीच हाणून पाडला, असे गृहमंत्री बोललेच नव्हते. मग त्यांच्या तोंडी असे विधान टाकण्याचे धाडस केले कोणी? ज्या कोणी हे धाडस केले तेच लोक सरकारला कमजोर करण्याचा प्रयत्न करीत आहेत,'', असे 'सूचक' विधान खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या माध्यमातून केले आहे. 

काही पोलिस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, तो हाणून पाडला, असं व्यक्तव्य देशमुख यांनी  एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. त्यावर "काही पोलिस अधिकारी सरकार पाडणार होते, असे मी म्हणालो नाही. ते वक्तव्य खोटे आहे, माझ्या तोंडी 'ते' शब्द टाकण्यात आले," असा खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल केला होता. यावर 'सामना'मध्ये भाष्य करण्यात आले आहे. काही अधिकाऱ्यांची मदत घेऊन काही 'अस्तनीतले निखारे' या हालचाली करत असल्याचे या अग्रलेखातून सूचीत करण्यात आले आहे.

''सरकारसंदर्भातले काही विषय गुप्तपणे विरोधकांकडे पोहोचवणे व सरकारच्या विरोधात प्रशासकीय यंत्रणेत अविश्वासाचे वातावरण निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींवर निगराणी ठेवणे हे गृहखात्याचे काम आहे. ते त्यांनी चोख पार पाडले तर सरकारचे भवितव्य उत्तम आहे. सरकार पाडण्याचा वगैरे प्रयत्न कोणताही अधिकारी करीत नाही. ते फक्त मनसुबेच ठरतात, पण अस्तनीत निखारे हे असतातच. सावधगिरी बाळगावीच लागेल!,'' अशा इशारा राऊत यांनी दिला आहे.

सरकार पाडण्याचा वगैरे प्रयत्न करीत होते ते अधिकारी कोण? याहीपेक्षा काही झाले तरी भाजपचेच सरकार बनले पाहिजे असे मानणारे सहानुभूतीदार कोण, ते महत्त्वाचे. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लादण्याआधी जो पहाटे पहाटे सरकार स्थापनेचा सोहळा पार पाडला त्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असायलाच हवेत व हे सर्व नाटय़ वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर झाले, असाही आरोप या अग्रलेखात करण्यात आला आहे. 

''मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत राहता यावे म्हणून काही पोलीस अधिकारी लहान पक्षांच्या आमदारांना व अपक्षांना वेगवेगळय़ा पद्धतीने जाळय़ात ओढत होते. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करीत होते. गुप्तचर खात्यानेही याकामी विशेष कामगिरी बजावली हे सत्यच आहे. बहुमत सिद्ध करून द्यायची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते, पण त्यांचे काहीच चालले नाही. फडणवीसांचे सरकार कोसळले व महाविकास आघाडीचे सरकार यायचे ते आलेच. त्यामुळे या मंडळींचे मन खट्टू झाले. आश्चर्य असे की, या काही सहानुभूतीदार अधिकारी मंडळाच्या भरवशावर कोणी सरकार पाडण्याचे मनसुबे पाहत असतील तर ते वेडगळपणाचे ठरेल,'' असा इशाराही या अग्रलेखातून करण्यात आला आहे.  
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख