मुंबई : राज्याचे वनमंत्री संजय राठोड गायब आहेत हे कुणी सांगितलं, मी त्यांना मगाशी फोन केला होता. ते, यशोमती ठाकूर, बच्चू कडू यांच्याशी मी कोरोनाच्या परिस्थितीबाबत बोललो. ही परिस्थिती आणखी गंभीर झाली तर त्यांच्या भागात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे मी त्यांना सांगितले, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकारांना सांगितले.
अजित पवार यांनी आज पूजा चव्हाण प्रकरणावर भाष्य केले. या प्रकरणात पुणे पोलिस चौकशी करत आहेत. ते त्यांचे काम करत आहेत. त्यांनी कुणाला तरी ताब्यात घेतल्याची ऐकीव माहिती आहे. संजय राठोड प्रकरणात मी काहीही माहिती घेतलेली नाही. मी पोलिसांना फोन करत नाही. पोलिसांना फोन केला तर मी हस्तक्षेप केला असे होईल, असेही अजित पवार म्हणाले.
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. त्याबाबत राज्यपालांनीही विचारणा केली आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता अजित पवार म्हणाल, "तसे विचारणे हा राज्यपालांचा अधिकार आहे. रिक्त जागा फार काळ ठेवता येणार नाही. विधानसभा अध्यक्षांबाबत महाविकास आघाडीतल्या तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे. सर्व आमदारांनाही बोलावण्यात आले आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय होईल,"
दरम्यान, आज अमरावती, अकोला व यवतमाळ या जिल्ह्यांचा कोरोना स्थितीचा आढावा घेतला असून या भागात कर्फ्यू अथवा लाॅकडाऊन लागण्याची शक्यता असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचीत केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काही वेळात अधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार असून त्यानंतर याबाबतचा निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. अनेक ठिकाणी कुठलीही बंधने पाळली जात नाहीत. ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण यवतमाळमध्ये आहेत. मुंबईपेक्षाही जास्त रुग्ण यवतमाळ मध्ये आहेत. लोक मास्क वापरायला तयार नाहीत. त्यामुळे कठोर निर्णय घ्यावा लागेल, असे पवार यांनी स्पष्ट केले. अमरावती, नागपूर विभागात परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

