मी निर्णय घेण्याआधी तू घे...मुख्यमंत्र्यांनी राठोडांना सुनावले - Sanjay Rathod May Resign before Assembly Session | Politics Marathi News - Sarkarnama

मी निर्णय घेण्याआधी तू घे...मुख्यमंत्र्यांनी राठोडांना सुनावले

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

टीकटाॅक स्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले वन राज्य मंत्री संजय राठोड आगामी अधिवेशनाच्या आधी राजीनामा देण्याची शक्यता आहे. पोहरादेवी येथे आपले समर्थक गोळा करुन शक्ती प्रदर्शन करणाऱ्या राठोडांना खुद्द  पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडूनच खडे बोल ऐकावे लागले आहे. 

मुंबई : टीकटाॅक स्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले वन राज्य मंत्री संजय राठोड आगामी अधिवेशनाच्या आधी राजीनामा देण्याची शक्यता आहे. पोहरादेवी येथे आपले समर्थक गोळा करुन शक्ती प्रदर्शन करणाऱ्या राठोडांना खुद्द  पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडूनच खडे बोल ऐकावे लागले आहे. 

परवा झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतही राठोड यांच्या वर्तणुकीवरुन नाराजी व्यक्त करण्यात आली होती. महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखिल राठोड प्रकरणावरुन नाराज असल्याची चर्चा आहे. संजय राठोड प्रकरणी चौकशीअंती दोषींवर नक्कीच कारवाई होईल. चौकशी पूर्ण झाल्यानंतर या संदर्भातील मुख्यमंत्री स्पष्टीकरण देतील. सर्वांना समान न्याय देण्याचे मुख्यमंत्र्यांचे धोरण आहे. पोहरादेवीवर केलले शक्तीप्रदर्शन कोरोना काळात करणे चुकीचे होते. विदर्भात कोरोना वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी तिथे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने गर्दी जमणे आणि जमवणे योग्य नाही, असा खुलासा शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांची संजय राठोड यांनी भेट घेतली. त्यात मुख्यमंत्र्यांनी राठोड यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे सांगण्यात आले आहे. 'मी काही निर्णय घेण्याअगोदर तू तुझा निर्णय घे,' असे मुख्यमंत्र्यांनी राठोडांना सांगितल्याचे समजते. त्यामुळे येत्या अधिवेशनाआधी संजय राठोड राजीनामा देतील अशी शक्यता आहे. 

दरम्यान, खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांनी थेट वानवडी पोलिसांकडे अर्ज देऊन वनमंत्री संजय राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे.  पुण्यात ७ फेब्रुवारीला पुजा चव्हाणची आत्महत्या झाल्यनंतर याप्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात मंत्री संजय राठोड व मृत पूजाच्या नावाच्या संभाषणाच्या १२ ऑडीओ क्‍लीप व्हायरल झाल्या होत्या. ऑडीओ क्‍लिपनुसार मंत्री राठोड यांनी पुजा चव्हाणच्या मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचे आदेश अरुण राठोड नावाच्या युवकाला दिले. ऑडीओ क्‍लीपवरून राठोड यांचे पुजाशी संबंध होते. सतच्या मानसिक त्रासाला कंटाळून, प्रेमभंग, किंवा त्याच्याकडून दबावाला व छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे. यानुसार, आत्महत्येस प्रवृत्त करणे, वाईट कृत्य करण्यास प्रवृत्त करणे यासाठी भारतीय दंड संहिता कलम ३०६ आणि १०७ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करताना त्यांना अटक करण्याची मागणी अर्जाद्वारे करण्यात आली आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख