पवारांच्या नांवाची चर्चा म्हणजेच काँग्रेस संपवण्याचा डाव.. - Sanjay Nirupam Alleges plot to finish Congress Party | Politics Marathi News - Sarkarnama

पवारांच्या नांवाची चर्चा म्हणजेच काँग्रेस संपवण्याचा डाव..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना संपवण्याची मोहिम सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे UPA चे अध्यक्षपद देण्याची मोहिम राबवली जात आहे, असा आरोप मुंबईचे काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केला आहे. 

मुंबई : दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना संपवण्याची मोहिम सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे UPA चे अध्यक्षपद देण्याची मोहिम राबवली जात आहे, असा आरोप मुंबईचे काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केला आहे. 

याबाबत निरूपम यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी हा आरोप केला आहे. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली होती. २३ नेत्यांच्या सह्यांचे पत्र काँग्रेस अध्यक्षांना पाठविण्यात आले होते. त्याचाही उल्लेख निरुपम यांनी या ट्वीटमध्ये केला आहे. काँग्रेस संपवण्याच्या या मोहिमेअंतर्गतच २३ नेत्यांच्या सह्यांचे पत्र पाठवण्यात आले. त्यानंतर राहुल गांधी यांच्या पक्ष चालवण्याच्या क्षमतेबाबत शंका व्यक्त केली गेली. हा सगळा काँग्रेस संपवण्याचा मोठा डाव आहे, असे निरूपम यांनी म्हटले आहे. 

काॅंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या सध्या यूपीएच्या अध्यक्षा आहेत. मात्र प्रकृती अस्वास्थामुळे त्या केंद्र सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेऊ शकत नाही. राहुल गांधी यांनी युपीएचे अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या पदासाठी पवारच योग्य असल्याची घटक पक्षांत चर्चा आहे.

पवार यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग राबवून भाजपला सत्तेवर येण्यापासून रोखले. पवार यांचे जम्मू-काश्मीर ते तमिळनाडूतील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. युपीएचा विस्तार करण्यासाठी आणि मोदी सरकार विरोधात एकजूट करण्यासाठी पवार हे प्रभावशाली ठरू शकतात. त्यामुळेच त्यांच्या नावावर एकमत होऊ शकते. अकाली दलासारखा पक्षही भाजपप्रणित एनडीएतून बाहेर पडला आहे. अकाली नेते प्रकाशसिंह बादल यांचे पवारांशी सौहार्दाचे संबंध आहेत. ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन, के. चंद्रशेखर राव हे प्रादेशिक नेते पवारांचे नेतृत्व सहजपणे मान्य करू शकतात. त्यामुळेच भाजप विरोधातील लढाईचे देश पातळीवर नेतृत्त्व करण्यासाठी गांधी घराण्याव्यतिरिक्तचा चेहरा पुढे यानिमित्ताने येऊ शकतो, अशी चर्चा आहे. 

मात्र, युपीएच्या अध्यक्षपदाबाबत कोणतीही चर्चा नाही, असे खुद्द पवार यांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे देशात महाविकास आघाडी पवारांच्या नेतृत्वाखाली अस्तित्त्वात येणार, ही शक्यता सध्या तरी टळली आहे.  महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांचं वर्षभरात चांगलंच जमल्याचं पाहायला मिळाले. त्यामुळेच पवारही दिल्लीत अशीच सूत्रे फिरवणार असल्याचे बोलले जात होते. 
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख