संभाजीराजेंनी मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान मोदींची भेट घ्यावी - Sambhaji Raje should meet Prime Minister Modi on Maratha reservation issue: Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

संभाजीराजेंनी मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान मोदींची भेट घ्यावी

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 29 मे 2021

हा प्रश्‍न आता राज्याच्या हातात राहिलेला नाही.

मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातील सर्व नेत्यांच्या भेटी घेतल्या. मात्र, हा प्रश्‍न आता राज्याच्या हातात राहिलेला नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असायला हवी. पंतप्रधानांनी निर्णय घ्यावा. त्यांच्या हाती महत्त्वाची पाने आहेत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नमूद केले. (Sambhaji Raje should meet Prime Minister Modi on Maratha reservation issue: Sanjay Raut)

संभाजीराजे छत्रपती हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील सर्व नेत्यांना भेटत आहेत. येत्या ६ जूनपर्यंत त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिले आहे. या पार्श्‍वभूमीवर संजय राऊत यांना माध्यमांनी विचारले असते ते म्हणाले, संभाजीराजे छत्रपती हे महाराष्ट्रातील सन्मानीय नेते आहेत. शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यामुळे त्यांचा संताप त्यांची भूमिका सरकारने समजून घेण्याची गरज आहे. सरकार ती समजून घेते. सगळ्यात प्रमुख भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घ्यायला हवी. हा प्रश्‍न आता राज्याच्या हातात राहिलेला नाही. केंद्राच्या अखत्यातरीत गेला आहे, असेही राऊत यांनी नमूद केले.

हेही वाचा : संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांच ठरलयं : कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेसाठीही इशारा

राज्यातील प्रत्येक राजकीय पक्ष, राजकीय नेता संभाजीराजे यांच्या भूमिकेशी सहमत आहे. आपण सगळे पंतप्रधान मोदींकडे जाऊया. यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस असा विषय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घ्यावा. पंतप्रधानांनी त्यांच्या हातातील हुकमाची पाने टाकावीत, असे सांगत मराठा आरक्षणप्रश्नी राऊत यांनी केंद्राकडे बोट दाखवले आहे.

....तर भाजपशासित राज्यात बीफवर बंदी का नाही

लक्षद्वीपमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल राऊत म्हणाले, आपण जो काही निर्णय घेणार आहोत, तो विचारपूर्वक आणि स्थानिकांना विचारात घेऊनच घेतला पाहिजे. तिथे अस्वस्थता निर्माण झाली, तर त्याचा अख्ख्या देशावर परिणाम होईल. या बेटावर जर कोणी धार्मिक उन्मादाचा प्रयत्न करत असेल, तर ते चुकीचे आहे. जर कोणी विकास करत असेल तर त्याला विरोध करायची गरज नाही. पण, कायदा सर्वांना हवा. तेथे बीफबंदीचा कायदा असेल, तर भाजपशासित राज्यात तशी बंदी का नाही, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख