Breaking - रिया चक्रवर्तीला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर - Rhea Chakraborty gets bail from Mumbai High Court | Politics Marathi News - Sarkarnama

Breaking - रिया चक्रवर्तीला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने एनसीबीने अंमली पदार्थ प्रकरणात अटक केलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे

मुंबई : सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने एनसीबीने अंमली पदार्थ प्रकरणात अटक केलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीचा जामीन मात्र फेटाळण्यात आला आहे. रियाबरोबरच सॅम्युएल मिरांडा व दीपेश सावंत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची  सलग तीन दिवस चौकशी केली होती. अखेर एनसीबीने रियाला ६ सप्टेंबरला अटक केली होती. त्यानंतर रिया न्यायालयीन कोठडीत भायखळा तुरुंगात होती.

रियाने सुशांतची बहीण प्रियांका सिंह हिच्याविरोधात वांद्रे पोलिसांकडे तक्रार केली होती. यात तिने सुशांतची बहीण प्रियांका सिंह, दिल्लीतील आरएमएल हॉस्पिटलमधील डॉ.तरुण कुमार यांच्यासह इतरांवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा आणि टेलिमेडिसीन प्रक्टीस गाईडलाईन्सनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यानुसार वांद्रे पोलिसांनी एफआयआर दाखल करुन तो तपासासाठी सीबीआयकडे वर्ग केला आहे. 

सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंत याला एनसीबीने अटक केली होती. दीपेश हा ड्रग्जची खरेदी आणि हाताळणी करीत होता असा त्याच्यावर आरोप आहे.अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा हे ड्रग्ज खरेदी करीत होते. त्यामुळे त्यांनाही अटक करण्यात आली होती. सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख