रत्नागिरीचे भाजप कार्यकर्ते निराश; राजकारणात वरिष्ठांची ढवळाढवळ - Ratnagiri BJP Workers unhappy over Leadership | Politics Marathi News - Sarkarnama

रत्नागिरीचे भाजप कार्यकर्ते निराश; राजकारणात वरिष्ठांची ढवळाढवळ

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 जानेवारी 2021

नेत्यांच्या थंड प्रतिसादाबद्दल काही पदाधिकारी उघड नाराजी व्यक्त करत आहेत. कार्यकर्ते, उमेदवारांचा दबाव आणि नेत्यांच्या प्रतिसादामुळे नेटाने उभे केलेले उमेदवार व यंत्रणा कशी गतिमान ठेवायची, हा पेच पडला आहे. रवींद्र चव्हाण यांचे सिंधुदुर्गवर जास्त प्रेम व रत्नागिरीबाबत उदासीनता दिसते. ठराविक पदाधिकारी, नेत्यांना उजवे माप द्यायचे, यामुळे संघटनेत नाराजीचा सूर आहे.

रत्नागिरी : आजी-माजी जिल्हाध्यक्ष एकवटले तरी भाजपच्या वरिष्ठांकडून पुरेशी रसद न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मदत अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे जिल्हा नेत्यांनी निवडणुकीसाठी सुयोग्य नियोजन केले. परंतु स्थानिक राजकारणात वरिष्ठांच्या ढवळाढवळ होत असल्याने कार्यकर्ते दुखावले आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान स्वबळावर ८००लहून अधिक जागा लढवत भाजपच्या कार्यकर्त्यांनी, नवीन पदाधिकाऱ्यांनी मुसंडी मारली. माजी आमदार बाळ माने-जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन हे सतत एकत्र प्रचारदौरे तालुका पदाधिकारी, रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्‍वर या ठिकाणी सक्रिय होऊन आक्रमक काम करत आहेत. ८०० अर्ज भरताना चारही तालुक्‍यात लावलेल्या व्यवस्थेमुळे भाजपचे सर्व अर्ज छाननी प्रक्रियेत पात्र ठरले. उत्तम नियोजन करण्यात पदाधिकाऱ्यांना यश मिळाले. सर्व पदाधिकारी कसून मेहनत घेत आहेत. 

अर्ज भरण्यासाठी मोठा तांत्रिक खर्चही केला. आमदार रवींद्र चव्हाण यांनी दोनवेळा जिल्ह्यात निवडणूक आढावा घेतला. निवडणूक खर्चासाठी अंदाजपत्रक बनवण्यास सांगून व्यवस्था होईल, असे सांगितले. त्यानंतर परत अचानकपणे आमदार प्रसाद लाड यांना निवडणूक प्रभारी म्हणून पाठवले. गेल्या सहा महिन्यांपासून रत्नागिरी दक्षिणचे प्रभारीपद लाड यांच्याकडून काढून घेतले आहे. चव्हाण, लाड आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यातील अंतर्गत वादाचा हा परिपाक होता, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

सिंधुदुर्गवर जास्त प्रेम व रत्नागिरीबाबत उदासीनता
नेत्यांच्या थंड प्रतिसादाबद्दल काही पदाधिकारी उघड नाराजी व्यक्त करत आहेत. कार्यकर्ते, उमेदवारांचा दबाव आणि नेत्यांच्या प्रतिसादामुळे नेटाने उभे केलेले उमेदवार व यंत्रणा कशी गतिमान ठेवायची, हा पेच पडला आहे. रवींद्र चव्हाण यांचे सिंधुदुर्गवर जास्त प्रेम व रत्नागिरीबाबत उदासीनता दिसते. ठराविक पदाधिकारी, नेत्यांना उजवे माप द्यायचे, यामुळे संघटनेत नाराजीचा सूर आहे.

निवडणुकीच्या तोंडावर नाराजी
प्रसाद लाड यांना प्रभारी म्हणून पाठवले. त्यांनी पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतले. अध्यक्ष, तालुकाध्यांसमवेत त्यांनी आढावा सभा घेतली. त्या वेळी संघटनमंत्री सतीश धोंड हे सुद्धा होते. परत आढावा घेऊन व्यवस्था होईल, असे सांगितले. पण दोन दिवस असताना कोणतीही रसद भाजप श्रेष्ठींनी न पाठवल्याने भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख