महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या आठवलेंना राष्ट्रपतींनी दिले हे उत्तर  - Ramdas Athavale met to President to demand implementation of President's rule in Maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या आठवलेंना राष्ट्रपतींनी दिले हे उत्तर 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 25 मार्च 2021

आरोपांमुळे महाराष्ट्राच्या गृह विभागाची प्रतिमा डागाळली आहे.

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी (ता. 25 मार्च) नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. 

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. राज्य सरकारला कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयश आले आहे. राज्य सरकारवरून जनतेचा विश्वास उडाला आहे. हे सर्व पाहता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रामदास आठवले यांनी आज राष्ट्रपतींची भेट घेऊन दिले. 

या वेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रपती कोविंद यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या रिपब्लिकन पक्षाच्या मागणीबाबत विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घरासमोर सापडलेली स्फोटकांची गाडी. त्यानंतर झालेल्या घटनाक्रमात महाराष्ट्राच्या गृह विभागाची प्रतिमा कलंकित झाली आहे. सचिन वाझे प्रकरण; त्यानंतर माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप, महिन्याला 100 कोटींची हफ्ता वसुली या सारख्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या गृह विभागाची प्रतिमा डागाळली आहे. त्याचबरोबर जनतेत भीतीचे वातावरण आहे. 

जोपर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त होत नाही; तोपर्यंत या गंभीर आरोपांची निष्पक्ष सखोल चौकशी होणार नाही, असेही आठवले या वेळी म्हणाले. 

कोरोनाच्या महामारीचा महाराष्ट्रात वेगाने फैलाव होत आहे. तीन पक्षांचा समावेश असलेले राज्य सरकार निर्णय घेण्यात कमालीचे उदासीन असून राज्याचा विकास खुंटला आहे. नाकर्तेपणा असलेल्या राज्य सरकारमुळे जनतेत निराशेचे वातावरण आहे. निसर्ग वादळ; कोरोनाचे संकट या सर्व आघाड्यांवर निष्क्रिय राहिलेले महाविकास आघाडीचे राज्य सरकार आहे. 

महाराष्ट्र सरकार त्वरीत बरखास्त करून येथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. त्याबाबतचे निवेदन गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रामदास आठवले यांनी दिले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे अश्वासन राष्ट्रपतींनी दिले असल्याचे आठवले यांनी पत्रकातून कळविले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख