मंत्र्यांनी महाराष्ट्रभर फिरुन दाखवावे - राजू शेट्टींचे आव्हान - Raju Shetty Challenges Electricity Bill Recovery | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्र्यांनी महाराष्ट्रभर फिरुन दाखवावे - राजू शेट्टींचे आव्हान

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 20 जानेवारी 2021

महावितरणने हिंमत असेल तर वीज बिल वसुली करुन दाखवावी आणि मंत्र्यांनीही महाराष्ट्रभर फिरुन दाखवावे, असे आव्हान माजी खासदार व स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिले आहे.

मुंबई : लाॅकडाऊनच्या काळातली थकित वीज बिले वसूल करण्याच्या महावितरणच्या निर्णयाला विविध राजकीय पक्षांकडून विरोध केला जात आहे. महावितरणने हिंमत असेल तर वीज बिल वसुली करुन दाखवावी आणि मंत्र्यांनीही महाराष्ट्रभर फिरुन दाखवावे, असे आव्हान माजी खासदार व स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिले आहे.

थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. राज्यात एकूण  63 हजार 740 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने वीजबिल वसुलीची मोहिम महावितरण राबविणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महावितरणविरूध्द रान पेटण्याची शक्यता आहे. 

लाॅकडाऊन काळात वाढीव वीजबिलांमुळे ग्राहक हैराण झाले होते. याविरोधात भाजप व मनसेने राज्यभर आंदोलने करत वाढीव वीजबिल न भरण्याचे आवाहन ग्राहकांना केले होते. महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2020 अखेर राज्यात एकूण  63 हजार 740 कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर कोणताच पर्याय उरलेला नाही.डिसेंबर अखेर राज्यातील कृषिपंप ग्राहकांकडे 45 हजार 498 कोटी रुपयांची थकबाकी आहे तर वाणिज्यिक,  घरगुती व औदयोगिक ग्राहकांकडे 8 हजार 485 कोटी रुपये व उच्चदाब ग्राहकांकडे 2 हजार 435 कोटी रुपयांची थकबाकी आहे.

राज्यात मार्च 2020 मध्ये कोविड 19 मूळे लॉकडाऊनच्या काळात थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित न करण्याचा निर्णय महावितरणने घेतला होता. राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबर अखेरपर्यत खंडित न करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. 

याबाबत शेट्टी म्हणाले, "लॉकडाउन काळातील विज बिल संदर्भात राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. या बिलामध्ये दिलासा देऊ असं वारंवार ऊर्जा मंत्री सांगत होते. मात्र ही गोड बातमी राहिली बाजूला आणि आता सक्तीने वीज बिल वसुली करणार आहेत. हिम्मत असेल तर वीज बिल वसुली करून दाखवावी आणि मंत्र्यांनीही महाराष्ट्रभर फिरून दाखवावे. राज्यात नेमकी काय परिस्थिती आहे हे त्यांना कळेल. जून महिन्यापासून आम्ही आंदोलन करत आहोत.  आम्ही मागे हटणार नाही
- ऊर्जा मंत्र्यांना काय करायचं ते करु द्या, आम्ही दोन हात करायला तयार आहोत."
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख