मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेच्या प्रश्नावरुन सतत सवाल उठवणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या मुलाची नील सोमय्या यांची काल मुंबई पोलिसांनी एका ठेकेदाराला धमकी दिल्या प्रकरणी तीन तास कसून चौकशी केली. मुंलुंड पोलिस ठाण्यात ही चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
एका ठेकेदाराला धमकावून दोन टाॅवरचे काम स्वतःच्या मर्जीतल्या ठेकेदाराकडे दिल्याचा आरोप नील सोमय्या यांच्यावर आहे. मुख्यमंत्र्यांवर बेनामी संपत्तीचा आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांच्या मुलाला आता मुंबई पोलिसांनी लक्ष्य केले आहे. एका हफ्तावसुली प्रकरणात ही चौकशी केल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी आधीच तीन जणांना अटक केली आहे. गेल्या वर्षी एका खासगी काॅर्पोरेट कंपनीने आपल्या दोन इमारतींचे काम एका खासगी ठेकेदाराला दिले होते. नील सोमय्या यांनी या ठेकेदाराला धमकावून हे काम आपल्या मर्जीतल्या कंत्राटदाराल मिळवून दिल्याची तक्रार पोलिसांकडे गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात दाखल झाली आहे.
जानेवारी २०२० मध्ये हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित कंत्राटदाराला धमकावून नील सोमय्यांच्या माणसांनी आपल्या आॅफिसमध्ये आणले व हे काम स्वतःकडे घेतले. काही दिवसांनी पुन्हा एकदा या कंत्राटदाराला आॅफिसमध्ये बोलावून धमकी दिली गेली. हे काम आपल्याला द्यावे किंवा नफ्याचा हिस्सा द्यावा, अशी धमकी या कंत्राटदाराला देण्यात आली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीवरुन गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर एक वर्षाने आता मुलुंड पोलिसांनी हे प्रकरण पुन्हा बाहेर काढले आहे. नील सोमय्या यांना समन्स बजावून पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांची तीन तास चौकशी करण्यात आली. त्यांचा जबाबही नोंदवून घेण्यात आला. त्यानंतर आता या जबाबाची पडताळणी करुन पुढील कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या जनतेसमोर मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढत आहेत, म्हणून अश्या खोट्या केसेस टाकल्या जात असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. विरोधकांवर केसेस करण्याचा हा कट आहे. किरीट सोमय्या प्रकरणे बाहेर काढत आहेत, म्हणून त्यांची मुस्कटदाबी सुरु आहे. गिरीश महाजन, प्रसाद लाड, चित्रा वाघ, नील सोमय्या अश्या लोकांवर केसेस दाखल करून सरकार विरोधातील लोकांना टार्गेट करणे सुरू आहे, असेही दरेकर यांनी म्हटले आहे.
Edited By - Amit Golwalkar

