आमदाराच्या सख्ख्या भावाला खंडणीच्या गुन्ह्यात अटक : परमबीरसिंग प्रकरणाची सत्ताधाऱ्यांना धास्ती

अपक्ष आमदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न
parambirsngh
parambirsngh

मुंबई  : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग (Ex Mumbai CP Parambirsingh) यांच्या खंडणीच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याबद्दल एका आमदाराच्या सख्ख्या भावालाच अटक केल्याने खळबळ उडाली आहे. या आमदाराने महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटत आहे. (Mumbai Police arrests brother of independent MLA who supports Thackeray govt)

खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले व्यावसायिक संजय पुनामिया हे वादग्रस्त पोलिस अधिकारी परमबीररसिंग यांचे निकटवर्तीय होते. तसेच महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या एका अपक्ष आमदाराचे सख्खे भाऊ आहेत. खंडणी आणि फसवणूक प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंग यांच्यासोबत सहा वरिष्ठ पोलिस अधिकाऱीही यात आरोप आहेत. यात संजय पूनमिया (वय ५५) व सुनील जैन (वय ४६) या दोघांना अटक करण्यात आली आहे. 

आमदाराच्या सख्ख्या भावाला अटक केली जात असेल तर महाविकास आघाडी आपल्याला सांभाळून घेणार यावर विश्वास तरी कसा ठेवायचा असा प्रश्न अपक्षांना पडला आहे. तर त्याच वेळी पाठिंबा देणाऱ्या अपक्षांच्या घरात शिरून काही उच्चपदस्थ सरकार पाडायचे प्रयत्न करत असल्याच्या भयाने सरकारला ग्रासले आहे.

पाठिंबा पोखरण्याच्या प्रयत्नांची पाळेमुळे अपक्षांपर्यंत मर्यादित नसून ती सत्ताधारी आघाडीतील आमदारांपर्यंत पसरली असल्याच्या शंकेने सध्या राजकीय वर्तुळ हादरले असून प्रत्येक आमदाराच्या हालचालींकडे त्या त्या पक्षाने लक्ष ठेवावे असे सांगण्यात आले आहे.

महाविकास आघाडीला ८ अपक्ष आमदारांचा तर बहुजन विकास आघाडी ३ ,समाजवादी पार्टी आणि प्रहार जनशक्ती प्रत्येकी दोन माकप आणि स्वाभिमानी पक्षाच्या प्रत्येकी एका आमदाराचा पाठिंबा आहे. यातील काही पक्षांचे भाजपशी सैद्धांतिक वैर असल्याने ते महाविकास आघाडीची साथ सोडणार नाहीत. मात्र अपक्ष आणि काही पक्षांचे आमदार भाजपकडे जावून बसले तर तिकडचे संख्याबळ वाढेल. अपक्ष आमदारांना स्थानिक स्तरावर मदत तसेच अडीअडचणीत आधार देण्याचे आश्वासन दिले असल्याने ते मविआबरोबर आहेत. मात्र त्यांचा आधार आवरता घेतल्यास ते केंव्हाही बाजू बदलतील.

`करेक्ट कार्यक्रमा`ची भाजपची भाषा असली तरी आम्ही एकेका आमदाराबाबत सावध असतो असे एका ज्येष्ठ मंत्र्याने स्पष्ट केले. आमदाराच्या अटकेतील भावाला कायद्याच्या चौकटीत राहून सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले गेले असले तरी या व्यक्तीला सरकार पाडण्याच्या कार्यक्रमाची माहिती होती. उच्चपदस्थ अधिकार्यामार्फतच त्याच्यापर्यंत पोहोचली असल्याने आता अधिकच सावध रहाणे अपरिहार्य असल्याचे महाविकास आघाडीतील कॉंग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.

रेकॉर्डींग हस्तगत

त्यातच काही रेकॉर्डिंग सत्ताधार्यांना प्राप्त झाले असून त्यातून काही योजना हाती लागते काय ते तपासणे सुरु झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलेल्या भेटीनंतर पुढे काय याबद्दल भाजपवर्तुळात तर्कवितर्क सुरु असतानाच अपक्ष आमदारांच्या घरात प्रवेशलेले नवे घटक सत्ताधाऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहेत. त्यामुळे आम्ही तुमच्या सोबत आहोत असा दिलासाही आमदारांना सरकारतर्फे दिला जात आहे.

काय आहे प्रकरण?

बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल आणि संजय पुनामिया यांनी भागीदारीत २००८ मध्ये दोन कंपन्या सुरू केल्या होत्या; मात्र दोघांमध्ये टोकाचे वाद झाल्याने ही भागीदारी २०११ मध्ये संपुष्टात आली. त्यानंतर संजय पुनामिया यांनी मुंबईसह इतर जिल्ह्यांत अग्रवाल यांच्याविरोधात १८ गुन्हे नोंदवले होते. २०१६ मध्ये संजय पुनामिया यांनी अग्रवाल यांच्याविरोधात ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्या वेळी अग्रवाल न्यायालयीन कोठडीत होते. नंतर पुनामियांतर्फे मनोज घटकर याला अग्रवाल यांचे पुतणे शरद अग्रवालकडे पाठवण्यात आले. घटकरने पुनामिया हे परमबीर सिंग यांचे आर्थिक व्यवहार पाहतात, अग्रवाल यांची गुन्ह्यांमधून सुटका करण्यासाठी त्यांनी पुनामिया व परमबीर सिंग यांना काही जागा विकाव्यात व १५ कोटी ५० लाख रुपये द्यावेत, असे घोटकरने सांगितले. तसे न केल्यास पुढील पाच वर्षे जेलमध्ये राहावे लागेल, अशी धमकीही त्याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या ३० मार्च रोजी संजय पुनामिया यांनी संबंधित मालमत्तेच्या करारावर जबरदस्ती शरद अग्रवाल यांच्या सह्या घेतल्या, तसेच उपायुक्त अकबर पठाण यांनाही पैसे द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर अकबर पठाण यांनीही ५० लाखांची मागणी केली. तसेच भाईंदरमधील दोन बीएचके फ्लॅट नावावर करण्यास धमकावले. तसे न केल्यास मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

परमबीर सिंगांच्या घरीही भेट
परमबीर सिंग यांच्या घरीही शरद अग्रवाल यांनी भेट दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनुसार त्या वेळी सिंग यांच्यासोबत उपायुक्त दर्जाचा अधिकारीदेखील उपस्थित होता. बैठकीनंतर अटक टाळण्यासाठी अग्रवाल यांनी पुनामियाला १५ कोटी ५० लाखांचा धनादेश व २५-२५ लाख दोन हप्त्याने दिले. त्यानंतर पुनामिया अग्रवालला एसीपी श्रीकांत शिंदेकडे घेऊन गेले. मोक्का गुन्ह्यात मदतीसाठी श्रीकांत शिंदेंना २५ लाख देण्यासाठी दटावले. त्यानुसार अग्रवालने २५ एप्रिल २०२१ रोजी ते पैसे संजय पुनामिया यांच्याकडे दिले. त्यानंतर परमबिर सिंग व पुनामिया यांच्यात झालेल्या सेटलमेंटनुसार अग्रवाल यांच्याकडे ११ कोटींसाठी पुनामियाने तगादा लावला. या वेळी पुनामियाने पोलिसांची मदत घेऊन कुटुंबियांवर पाळत ठेवल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

खोटे दस्तावेज बनवत मालमत्ता हडपली
अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलमार्फत पुनामियाला धमकी दिल्याच्या आरोपाखाली मोक्काचा गुन्हा नोंदवून अटक करण्याची धमकी मुंबई पोलिस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी दिली, असेही तक्रारीत म्हटले आहे. तसेच पुतण्याची सही घेऊन खोटे दस्तावेज बनवून अग्रवाल यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खंडणी म्हणून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com