जमावबंदी, संचारबंदी?... नेमके काय? जनता संभ्रमात - People in Maharashtra Confused over New Corona Restrictions Order | Politics Marathi News - Sarkarnama

जमावबंदी, संचारबंदी?... नेमके काय? जनता संभ्रमात

सरकारनामा ब्युरो
रविवार, 28 मार्च 2021

राज्यात कोरोनाचे संकट वाढते आहे. त्यामुळे राज्यसरकारने आजपासून नवे निर्बंध जारी केले आहेत. मात्र, आज रात्री आठपासून राज्यात नक्की जमावबंदी आहे की संचारबंदी याबाबत जनतेत संभ्रम आहे. महाराष्ट्र पोलिसांनी याबाबत केलेले ट्वीटही संभ्रमात टाकणारे आहे

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट वाढते आहे. त्यामुळे राज्यसरकारने आजपासून नवे निर्बंध जारी केले आहेत. मात्र, आज रात्री आठपासून राज्यात नक्की जमावबंदी आहे की संचारबंदी याबाबत जनतेत संभ्रम आहे. महाराष्ट्र पोलिसांनी याबाबत केलेले ट्वीटही संभ्रमात टाकणारे आहे. (People in Maharashtra Confused over New Corona Restrictions Order)

२८ मार्च, २०२१ पासून संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) 'नाईट कर्फ्यु' लागू करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या (Corona Virus) संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे ट्वीट महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) अधिकृत ट्वीटर हँडलवरुन करण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला  महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार १५ एप्रिलपर्यंत पुन्हा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. पबमधली गर्दीमुळे कोरोना वाढत असल्याचे लक्षात घेत आता रात्री ८ नंतर पाच जणांनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे, असा आदेश काल जारी करण्यात आला आहे.

त्यामुळे रात्री बाहेर पडायला परवानगी आहे की नाही, याबाबतच संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान रुग्णसंख्येत  वाढ होत राहिली तर काही शहरात लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा लागेल.अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. ते आज जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली रुग्णवाढ कायम राहिली तर काही शहरांमध्ये लॉकडाऊन (Lock Down) लावावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. याचा निर्णय १ तारखेनंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन घेतला जाईल, असे टोपे यांनी सांगितले. (People in Maharashtra Confused over New Corona Restrictions Order)

दुसरकडे नव्या निर्बंधांवरुन विरोधी पक्ष सरकारवर टीका करत आहे. हिंदू विरोधी ठाकरे सरकार म्हणतेय होळी घराच्या दारा समोर पेटवायची नाही. तर मग काय घरात पेटवायची? असा सवाल भाजपचे आमदार राम कदम यांनी सरकारला उद्देशून केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नवे नियम लागू केले आहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर संयम राखून हा सण साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. त्यावरुन राम कदम यांनी सरकारवर टीका केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख