no funds from social justice department diverted elsewhere: Dhananjay Munde reveals | Sarkarnama

  सामाजिक न्याय विभागाचा कोणताही निधी इतरत्र वळविला नाही : धनंजय मुंडे यांचा खुलासा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 जुलै 2020

सारथी या संस्थेचे नियोजन कसे असावे व त्याची स्थापना करणे हे विषय इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे हस्तांतरीत होण्यापुर्वी म्हणजेच हे नवीन खाते तयार होण्यापूर्वी सन २०१८ - २०१९ व   सन २०१९ - २० मध्ये सामाजिक न्याय विभागाकडे होते. 

मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण विभागाने ०९ जुलै रोजी काढलेल्या एका पत्रानुसार २०१८ -१९ व २०१९ - २० या वित्तीय वर्षातील अखर्चित निधी २०२० - २१ मध्ये सारथी या संस्थेस खर्च करण्यासाठी परवानगी दिली असून, यासाठी सामाजिक न्याय विभागातील कोणताही निधी वळविण्यात आलेला नसल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाने  दि. ०९ जुलै रोजी काढलेल्या पत्रानुसार  सन २०१८ - २०१९ व सन २०१९ - २०२० या वित्तीय वर्षात अखर्चीत राहिलेला निधी सन २०२० - २०२१ या वर्षात खर्च करण्याची परवानगी  व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांना दिली आहे. 

या पत्रावरून काही मंडळींचा सामाजिक न्याय विभागाचा निधी सरकारने इतरत्र वळवल्या बाबत गैरसमज निर्माण झाला आहे, समाज माध्यमातून व सोशल मीडियाद्वारे या संबंधी काही पोस्ट व्हायरल होऊ लागल्या आहेत. मात्र अशा प्रकारे कोणताही निधी वळवण्यात आला नसून याबाबत स्वतः धनंजय मुंडे यांनी  आपल्या फेसबुकवर एक पोस्ट करून सविस्तर खुलासा केला आहे.

सारथी या संस्थेचे नियोजन कसे असावे व त्याची स्थापना करणे हे विषय इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे हस्तांतरीत होण्यापुर्वी म्हणजेच हे नवीन खाते तयार होण्यापूर्वी सन २०१८ - २०१९ व   सन २०१९ - २० मध्ये सामाजिक न्याय विभागाकडे होते. 

त्यावेळी सारथी या संस्थेस आवश्यक असलेल्या निधीची तरतूद ही सर्वसाधारण योजनेतून करण्यात आलेली होती. अनुसुचित जाती साठी असलेल्या अनुसुचित जाती उपयोजनेतुन नव्हे व ती तरतूद त्यांना उपलब्ध केलेली होती व त्यांच्याकडे अखर्चीत राहिलेली तरतूद खर्च करण्यास आता हे विषय बहुजन कल्याण विभागाकडे असल्याने त्या विभागाने परवानगी दिलेली आहे.

या बाबींसाठी कुठेही अनुसूचित जाती उपयोजनेच्या किंवा सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही निधीचा वापर करण्यात आलेला नाही. 

महाविकास आघाडीचे सरकार सामाजिक न्याय विभागाचा कोणताही निधी इतरत्र खर्च न करता तो विभागाच्‍या योजनावर शंभर टक्के खर्च करेल अशी ग्वाही मी देतो. याबाबतीत कोणीही गैरसमज निर्माण करू नयेत अशी नम्र विनंती करतो, असेही मुंडेंनी म्हटले आहे.

Edited by prakash patil

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख