गृहमंत्री अनिल देशमुखांसाठी आगामी सहा दिवस महत्त्वाचे  - The next six days are important for Home Minister Anil Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

गृहमंत्री अनिल देशमुखांसाठी आगामी सहा दिवस महत्त्वाचे 

उत्तम कुटे 
बुधवार, 24 मार्च 2021

ती नोंदविण्यात न आल्याने त्यांनीही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

पिंपरी : भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याने उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या ऍड जयश्री पाटील यांच्या याचिकेवर येत्या मंगळवारी (ता. 30 मार्च) सुनावणी होणार आहे. स्वतः पाटील यांनी ही माहिती बुधवारी (ता. 24 मार्च) 'सरकारनामा'ला दिली. 

दरम्यान, देशमुख यांच्याविरुद्धच्या परमबीर सिंग यांच्या याचिकेवर उद्या (ता. 25 मार्च) सुनावणी होणार आहे. त्यामुळे देशमुखांच्या दृष्टीने आगामी सहा दिवस खूपच महत्वाचे आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष त्याकडे लागलेले आहे. 

मुंबई पोलिस आयुक्तपदावरून राज्य सरकारने केलेल्या आपल्या बदलीला परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याबरोबरच देशमुखांनी महिन्याला शंभर कोटी रुपये हफ्ता पोलिस अधिकाऱ्यांना गोळा करण्यास सांगितला होता. त्याचीही सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या याचिकेत केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी ती फेटाळून लावली. ही घटना मुंबईतील असल्याने प्रथम तेथील उच्च न्यायालयात संबंधितांस जाण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तसेच, त्याबाबत उद्या लगेच सुनावणी घेण्याचा आदेश दिला आहे. 

दुसरीकडे, ऍड. पाटील यांनीही देशमुखांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी 21 मार्च रोजी मुंबईतील मलबार हिल पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. मात्र, ती नोंदविण्यात न आल्याने त्यांनीही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या 30 तारखेला सुनावणी होणार असल्याचे बुधवारी (ता. 24 मार्च) पाटील यांनी सांगितले. पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केला. खंडणी उकळली, बेकायदेशीर कमाई केली; म्हणून देशमुख व वाझेंविरुद्ध आयपीसी आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाईची पाटील यांची मागणी आहे. 

हेही वाचा परमबीर सिंग यांना धक्का : देशमुखांविरोधातील याचिकेच्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार 

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. त्यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. 

राज्य सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. देशमुखांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते.

मागील काही महिन्यांत वाझेंना गृहमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी अनेक वेळा बोलावले होते. या भेटींमध्ये ते वाझेंना निधी गोळा करण्यासाठी सांगत, असे आरोप परमबीर सिंग यांनी या पत्रात केले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख