मुंबई : सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या बलात्कार प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते कृष्णा हेगडे यांनी संबंधित महिला आपल्यालाही गेल्या दहा वर्षांपासून ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला आहे. संबंधित महिलेविरोधात हेगडे हे अंधेरीजवळच्या आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार देणार आहेत.
धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराची तक्रार पोलिसांत दिली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मोठे राजकीय वादळ उठले आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडून मुंडे यांच्यावर टीकेचे झोड उठवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफ्फुल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर "पोलिस तपासात जो निष्कर्ष निघेल, त्यानुसार निर्णय घेण्यात येईल,' असे जयंत पाटील यांनी सांगितले होते.
त्यानंतर थोड्याच वेळात हेगडे यांनी एक वृत्तवाहिनीशी बोलताना हे आरोप करत संबंधित महिलेच्या विरोधात पोलिसांत तक्रार देणार असल्याचे सांगितले. याबाबत हेगडे यांनी सांगितले, "संबंधित महिला ही मला 2010 पासून संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करत होती. वेगवेगळ्या नंबरवरून मला फोन आणि व्हॉट्स ऍप मेसेज करायची. हा हनिट्रॅपचे प्रकरण आहे, हे लक्षात आल्यानंतर तिला टाळण्याचा प्रयत्न केला. पण, ती पाच ते सहा वर्षे माझा पिच्छा पुरवत होती. तिला म्युझिक व्हिडिओसाठी पैसे पाहिजे होते. त्यामुळे ती मला पुन्हा पुन्हा फोन व मेसेज करत होती. पण मी तिला दूर ठेवले.''
"तिने मला "आप मुझे भूल गये क्या?' असा मेसेज सहा आणि सात जानेवारी 2021 रोजी पुन्हा केला. त्यानंतर आठ आणि नऊ तारखेला धनंजय मुंडे यांचे प्रकरण बाहेर आले. मला वाटलं की अशी जी लोकं आहेत, जी दुसऱ्याला ब्लॅकमेल करतात, त्यांचा भांडाफोड करण्यासाठी मी एवढ्या वर्षांनी बाहेर येऊन हे सांगत आहे. कारण, आज ते धनंजय मुंडे यांना फसवत आहेत, ते उद्या दुसऱ्या कोणाला फसवतील. ते रोखण्यासाठी मी हे सांगत आहे. यात कोणतंही राजकारण नाही. मला जो अनुभव आला, तो मी सर्वांसमोर मांडला,'' असे कृष्णा हेगडे यांनी सांगितले.

