NCP Leader Sharad Pawar Held Meeting at Matoshree Yesterday | Sarkarnama

ठाकरे पवारांसमोर अजित दादा व एकनाथ शिंदेंचे युक्तीवाद

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 जुलै 2020

पारनेर, कल्याणवरुन शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी  शरद पवार काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी 'मातोश्री'वर गेले. सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री अनिल देशमुख हेही होते

मुंबई  : पारनेरमध्ये शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तर कल्याण पंचायत समितीमध्ये सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवत भाजपशी हातमिळवणी केली. यावरुन महाविकास आघाडीतल्या दोन्ही पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु झाले आहे. काल 'मातोश्री' वर झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपापल्या पक्षाच्या बाजूने युक्तीवाद करत आपली बाजू बरोबर असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला.

महाविकास आघाडीतल्या शिवसेना व राष्ट्रवादीत सुरू झालेल्या राजकीय कुरघोडीवर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिष्टाई केली. गृहविभागाने मुंबईतील दहा पोलिस अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्यांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. तर, पारनेरमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर कल्याण व अंबरनाथ पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी हातमिळवणी करत राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिले होते. यावरून महाविकास आघाडीतल्या या दोन्ही पक्षात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यात मार्ग काढण्यासाठी  शरद पवार काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी 'मातोश्री'वर गेले. सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री अनिल देशमुख हेही होते. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात सरकारमधील घटक पक्षांत समन्वय नसल्याबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व गृहविभागाच्या अधिकाऱ्यांच्या इशाऱ्याने अशी कारवाई झाल्याची तक्रारच गृहमंत्र्यांनी केल्याचे समजते. 

तर, अधिकाऱ्यांवर विश्वास दाखवत मुख्यमंत्र्यांनी आपले सहकारी मंत्री अनिल देशमुखांना विश्वासात न घेता कारवाई केल्याची नाराजी शरद पवार यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. यावर अशाप्रकारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचा निर्णय घेताना समन्वय व संवाद हवा अशी सूचना पवार यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

'पारनेर' 'कल्याण' बाबतही चर्चा
पारनेर नगरपालिका व कल्याण पंचायत समितीत शिवसेना व 'राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  झालेल्या राजकीय कुरघोडीबाबत शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपापल्या पक्षाची बाजू मांडली. पारनेरचे शिवसेना नगरसेवक हे राष्ट्रवादीचे आमदार लंके यांचे समर्थक आहेत. लंके शिवसेनेतून राष्ट्रवादीत येण्याअगोदर हे नगरसेवक शिवसेनेतून निवडून आले. पण आता ते राष्ट्रवादीत येताना स्थानिक राजकारणामुळे आल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

कल्याण मध्ये राष्ट्रवादीला समर्थन देण्यासाठी शिवसेनेचे सदस्य सहमत नव्हते. ऐनवेळी भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेने हे पाऊल उचलल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. अशाच प्रकारे शिवसेनेने उस्मानाबाद जिल्हा परिषदेतही भाजप सोबत युती केल्याचा विषय देखील चर्चेत आला. अशावेळी महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमाच्या अजेंड्यावर विपरीत परिणाम होत असल्याची नाराजी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. यापुढे कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्था मधे पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात समन्वय व संवाद साधून निर्णय घेतला जावा, अशी यावेळी चर्चा झाल्याचे समजते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख