योगी आदित्यनाथ यांचीच 'नार्को' करा : नवाब मलिक - NCP Leader Nawab Malik Demands Narco test of UP CM Yogi Adityanath | Politics Marathi News - Sarkarnama

योगी आदित्यनाथ यांचीच 'नार्को' करा : नवाब मलिक

तुषार रुपनवर
रविवार, 4 ऑक्टोबर 2020

धिकाऱ्यांनी नार्को टेस्ट जरुर करण्यात यावी. मात्र, हे अधिकारी योगी आदित्यनाथ यांच्या सांगण्यावरुन काम करत होते. त्यामुळे हाथरस प्रकरणात योगी आदित्यनाथ यांचीही नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे

मुंबई : हाथरस बलात्कार प्रकरणातील पिडितेचे कुटुंबिय व संशयित आरोपी यांची तसेच पोलिस अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारने केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीच नार्को चाचणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

हाथरसमधील 19 वर्षांच्या दलित युवतीवर चार जणांनी अत्याचार केला होता. ही घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. नंतर उपचारादरम्यान दिल्लीतील रुग्णालयात त्या युवतीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरलीआहे. यातच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्या पीडितेच्या कुटुंबीयांना विश्वासात न घेता परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

योगी आदित्यनाथ या प्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड चालवली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीअंती हाथरसचे पोलीस अधीक्षक (एसपी), उपअधीक्षक (डीएसपी), पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची नार्को चाचणी करण्यात येणार आहे.  तसेच पिडितेचे कुटुंबिय व आरोपींचीही नार्को टेस्ट करण्यात येईल, असे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे.

याबाबत बोलताना नवाब मलिक म्हणाले, "अधिकाऱ्यांनी नार्को टेस्ट जरुर करण्यात यावी. मात्र, हे अधिकारी योगी आदित्यनाथ यांच्या सांगण्यावरुन काम करत होते. त्यामुळे हाथरस प्रकरणात योगी आदित्यनाथ यांचीही नार्को टेस्ट झाली पाहिजे," सुशांतसिंह राजपूत प्रकरणात भाजपने जाणीवपूर्वक मुंबई पोलिसांची बदनामी केली. बिहार निवडणुकीसाठी त्यांनी हे षडयंत्र रचले. मात्र, ते अयशस्वी ठरले, असेही मलिक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

दरम्यान, हाथरस प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता पिडीत कुंटुबीयांच्या नार्को टेस्ट आणि पॅालीग्राफ टेस्ट करण्यास विरोध करणारी जनहित याचिका अलाहाबाद उच्चन्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे मित्र आणि मुंबई येथील सामाजिक कार्यक्रते साकेत गोखले यांनी ही याचिका दाखल केली आहे. साकेत गोखले हे राहुल गांधी यांचे जवळचे मित्र असल्याचे बोलले जाते. राहुल गांधीच्या टि्वटला ते नेहमीच रिटि्वट करीत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ते सोशल मीडीयावर सक्रीय आहेत. याबाबत 12 तारखेला सुनावणी होणार आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख