राज्यपाल कोटा : राष्ट्रवादीच्या यादीत खडसे, राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि यशपाल भिंगे - NCP Decides four names for Governor Nominated seats | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यपाल कोटा : राष्ट्रवादीच्या यादीत खडसे, राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि यशपाल भिंगे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

मुख्यमंत्री विधानपरिषदेवरील  राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नांदेडचे धनगर नेते यशपाल भिंगे भाजपमधून नुकताच पक्ष प्रवेश केलेले एकनाथ खडसे, माजी खासदार राजू शेट्टी आणि गायक आनंद शिंदे यांची चार नावे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले

मुंबई : मुख्यमंत्री विधानपरिषदेवरील  राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नांदेडचे धनगर नेते यशपाल भिंगे भाजपमधून नुकताच पक्ष प्रवेश केलेले एकनाथ खडसे, माजी खासदार राजू शेट्टी आणि गायक आनंद शिंदे यांची चार नावे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, पक्षाकडून याबाबत अद्याप अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेले नाही.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष चार चार नावांचा बंद लिफाफा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सोपवणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोशियारी आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध लक्षात घेता ही नावे मान्य केली जातील काय याबाबत शंका आहे. 

कॉंग्रेसची नावे अद्याप मुंबईला मिळालेली नाहीत. दिल्लीतून ही नावे कोणत्याही क्षणी प्राप्त होतील, असे राज्यातले नेते सांगत आहेत. मात्र रात्री उशीरापर्यंत ही नावे येथे पोहोचली नव्हती. युवक कॉंग्रेसला अग्रेसर करणारे सत्यजित तांबे , आक्रमक प्रवक्ते सचिन सावंत, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, रजनी पाटील या नावांबरोबरच मुजफ्फर हुसेन, नसीम खान आणि डॉ. भालचंद्र मुणगेकर ही नावे चर्चेत आली आहेत. अर्थात कॉंग्रेसचे शेवटच्या क्षणापर्यंत काही सांगता येत नाही असे एका मंत्र्याने सांगितले.

सेनेकडून सिंधुताई सपकाळ,  सुबोध भावे?
शिवसेनेने समाजसेवा साहित्य कलाक्रीडा या क्षेत्रातील नावेच पुढे पाठवण्याचे जवळपास ठरवले आहे. समाजसेविका सिंधुताई सपकाळ, अभिनेते आदेश बांदेकर, सुबोध भावे यांची नावे निश्चित झाली आहेत. युवासेनेला प्रतिनिधित्व की उध्दव ठाकरे यांची सावली म्हणून वावरणारे मिलिंद नार्वेकर असा तिढा आहे. राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्या सेनेला सोडण्याच्या काळात सुभाष देसाई, संजय राउत आणि मिलिंद नार्वेकर या तिघांनी उद्धव ठाकरेंची साथ दिली. त्यातील नार्वेकर यांना अद्याप राजकीय पद मिळाले नाही, मात्र, त्यांचा विचार होणार की त्यांचे महत्व कमी करण्यासाठी युवा सेनेतील नवा चेहरा समोर आणणार यावर ठाकरेंनाच निर्णय घ्यावा लागेल. 

राष्ट्रवादीतही हालचाली महाविकास आघाडीतला तिसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनेही हालचाली सुरु ठेवल्या आहेत. राज्यपाल निकषात बसणारी नावेच मान्य करतील हे लक्षात घेत एकनाथ खडसे , राजू शेटटी यांची नावे पुढे पाठवायची का याबाबत उच्चस्तरावर खल झाला. खडसे यांची कन्या रोहिणी यांचे सहकार क्षेत्रातील काम लक्षात घेता त्यांचे नाव पाठवायचे असेही विचारात आहे.  
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख