NCP Maharasthra Chief Jayant Patil
NCP Maharasthra Chief Jayant Patil

जयंत पाटील करणार १८ दिवसांत ३ हजार किलोमीटरचा प्रवास

गुरुवार दिनांक २८ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्हयातील अहेरी येथून पहिल्या टप्प्याला सुरूवात होणार आहे.या दौऱ्याच्या माध्यमातून पक्षातील इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सलग १८ दिवस ३ हजार किलोमीटरचा प्रवास करत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी जयंत पाटील संवाद साधणार आहेत.

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे गुरूवारपासून 'राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याला सुरुवात करणार आहेत.याबाबतची घोषणा शनिवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली होती. 

गुरुवार दिनांक २८ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्हयातील अहेरी येथून पहिल्या टप्प्याला सुरूवात होणार आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून पक्षातील इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सलग १८ दिवस ३ हजार किलोमीटरचा प्रवास करत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी जयंत पाटील संवाद साधणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच संवाद, समन्वय व पारदर्शकतेची भूमिका घेतली आहे. याआधीही पक्षाने कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी 'राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय' ही डिजिटल मोहीम हाती घेतली होती. राज्यातील कार्यकर्त्यांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व सात लाख कार्यकर्त्यांपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी आपला अभिप्राय या मोहिमेत नोंदवल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याच्या १८ दिवसामध्ये विदर्भ व खान्देशातील १४ जिल्हे, ८२ मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. शिवाय कार्यकर्त्यांच्या १३५ बैठका व १० जाहीर सभा होणार आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार असे १४ जिल्हे पायाखाली घालत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कार्यकर्त्यांच्या अडचणी लक्षात घेणार आहेत शिवाय पक्ष वाढवण्यासाठी रणनीती आखली जाणार आहे. तसेच जलसंपदा विभागाच्या प्रलंबित प्रश्नांबाबतही या दौऱ्यात बैठका घेतल्या जातील व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 

राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याचा हा पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित महाराष्ट्रात दौरा केला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार संवाद हा त्या भागातील पक्षाची सद्यस्थिती, स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्साह, त्यांना पक्ष संघटना वाढविण्यासाठी येणारी वेगवेगळी आव्हाने या गोष्टींचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आहे. 

या दौऱ्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, यांच्यासह राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे उपस्थित राहणार आहेत.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com