मराठा आरक्षणाबाबतची माझी भूमीका अशोक चव्हाणांना रुचली नसावी : नरेंद्र पाटील - Narendra Patil comments on Ashok Chavan | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा आरक्षणाबाबतची माझी भूमीका अशोक चव्हाणांना रुचली नसावी : नरेंद्र पाटील

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

मराठा आरक्षणाबाबत मांडत असलेली भूमिका अशोक चव्हाण यांना रुचत नसावी, म्हणून हा प्रकार झाला असावा, असे खडे बोल सुनावत यापुढे चव्हाण हे आपल्या रडारवर राहतील, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे

मुंबादेवी : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ बरखास्त करण्यात आल्याने माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी बुधवारी (ता. ११) पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणाबाबत मांडत असलेली भूमिका अशोक चव्हाण यांना रुचत नसावी, म्हणून हा प्रकार झाला असावा, असे खडे बोल सुनावत यापुढे चव्हाण हे आपल्या रडारवर राहतील, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ बरखास्त करण्याचा मोठा निर्णय उद्धव ठाकरेंच्या सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मंडळाच्या सर्व नेमणुका रद्द करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाला हा एक प्रकारे मोठा धक्का असल्याचं समजलं जात आहे. अध्यक्ष नरेंद्र पाटील गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका करत होते. त्यामुळेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ बरखास्त निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील एक लाख मराठा तरुणांना उद्योग, रोजगार तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट असल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं होतं. आतापर्यंत ११ हजार मराठा तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून साडेपाचशे कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली होती. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला नागपुरात बोलावून अधिवेशनादरम्यान महामंडळाचा आढावा घेतल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं होतं. महामंडळ अजून गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा जबाबदारी सांभाळण्यास सांगितले असल्याचंही पाटील यांनी म्हटलं होतं. पण, आता अचानक मंडळ बरखास्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

याबाबत बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, "नांदेडमध्ये चव्हाण यांच्या विरोधात भूमिका मांडली होती. त्यामुळे महामंडळ बरखास्त आले असावे. मात्र या पुढे माझी भूमिका अधिक तीव्र करणार आहे. आता अशोक चव्हाण हटावची मागणी आणखी जोरदार करणार असून, एकनाथ शिंदे यांच्या निवडीची मागणी लावून धरणार आहे. शिंदे यांना मराठा आरक्षणाबद्दल अधिक जाण आहे.''

''चव्हाण यांनी वकिलांना विश्‍वासात घेतले नाही. त्यांनी याबाबत वेळोवेळी चर्चा देखील केली नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांनी काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आपल्याकडे महामंडळ राहावे, यासाठी कधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली नाही,'' असेही पाटील यावेळी म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख