....अन्‌ नारायण राणे म्हणाले, तुमच्या तोंडात साखर पडो! - (Narayan Rane spoke about the possible inclusion in the Union Cabinet | Politics Marathi News - Sarkarnama

....अन्‌ नारायण राणे म्हणाले, तुमच्या तोंडात साखर पडो!

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 जुलै 2021

सरकारला वाचवण्यासाठी आमदारांचं निलंबन केलंय.

सिंधुदुर्ग : ‘‘मी आभार मानतो आणि असं काही घडो आणि तुमच्या तोंडात साखर पडो. जोपर्यंत अधिकृत पत्र येत नाही आणि मी जोपर्यंत शपथ घेत नाही, तोपर्यंत जरा धीर धरा,’’ असे सूचकपणे हसत नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात तुमच्या नावाची चर्चा होतेय या प्रश्नाच्या उत्तरादाखल भाष्य केले. (Narayan Rane spoke about the possible inclusion in the Union Cabinet)

राज्यातील विधीमंडळाचे अधिवेशन आजपासून (ता. ५ जुलैपासून) सुरू झाले. अधिवेशन आणि त्यातील घडामोडींवर राणे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले. विधानसभेतील भाजप आमदारांच्या निलंबनाबाबत राणे म्हणाले की, सरकारला वाचवण्यासाठी आमदारांचं निलंबन केलंय. सरकारने जरी आमच्या बारा आमदारांचं निलंबन केलं असलं तरी आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. भास्कर जाधव कुठे आहेत. कुठल्या पक्षात आहेत, हे शोधावं लागतं. देवेंद्र फडणवीस आता विरोधी पक्षनेते आहेत. उद्या मुख्यमंत्री होतील, भास्कर जाधव कोण आहेत, असा सवालही त्यांनी केला.

हेही वाचा : आदित्य ठाकरे सांगतील त्याच फाईलवर मुख्यमंत्री सही करतात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर झालेली कारवाई कायदेशीर असून साखर कारखाने डबघाईला आणून तेच करखाने कमी किंमतीत विकत घेतले म्हणून ईडीने ही कारवाई केली आहे, असा युक्तीवादही त्यांनी केला.

शिवसेनेच आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राबाबत राणे म्हणाले की, आपण चुका करायच्या आणि पक्षाने सांभाळायच्या यातील तो प्रकार आहे. त्यांना सरकारनेही पाठीशी घालणे, हे कितपत योग्य आहे, हे त्यांचं त्यांना माहिती. सरनाईक यांनी पत्र लिहिलं कारण, ते भयभीत झाले आहेत, असा दावाही राणे यांनी केला. 

राज्यातील विधीमंडळाचे अधिवेशन फक्त सत्ताधारी तीन पक्षाचं आहे. महाराष्ट्रात जटील, गंभीर प्रश्न असताना सरकार दोन दिवसाचं अधिवेशन घेऊन पळ काढत आहे. अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घ्यायची असते. मात्र, ते पळून गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणत्याही गोष्टीचे गांभीर्य नसल्यामुळे त्यांनी दोन दिवसाचं अधिवेशन ठेवले आहे. एका बाजूला स्वतःला वाघ म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने कोल्ह्यासारखा पळ काढायचा,’’ अशा शब्दांत राणे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.

ओबीसींचा इंपेरीकल डेटा केंद्र सरकारने दिला नाही; म्हणून अधिवेशनात ठराव करता. मग, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पन्नास मिनीटे चर्चा कसली करत होता. आपल्या घरातील, पक्षातील कोणावर कारवाई करू नका म्हणून का? असा सवालही त्यांनी या वेळी केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख