मुंबई : भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात मंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. राणे यांनी सिंधुदुर्ग व रत्नागिरीत ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला जे यश मिळवून दिले, त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्यांच्यावर खूष असून त्यांच्यामुळे राणेंना लवकरच मंत्रीमंडळात संधी मिळेल, असे बोलले जात आहे.
भाजपा नेते नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. त्यावेळी शहा यांनी राणेंची स्तुती केली होती. ''नारायण राणे हे मेहनती व अन्यायाचा प्रतिकार करणारे नेते आहेत. ते अत्यंत निडरपणे संघर्ष करतात. त्यांची राजकीय कारकिर्द वळणावळणाची असली तरीही त्यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होणार नाही, याची मी ग्वाही देतो. राणेंसारख्या नेत्याला कसे सांभाळायचे हे भाजपला चांगले समजते, असे शहा म्हणाले होते,'' माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाषणात नारायण राणे यांचा उल्लेख महाराष्ट्राचे 'दबंग नेते' असा केला होता. "अनेक लोक स्वप्नं पाहतात. मात्र, आपली झोप विसरून त्या स्वप्न पूर्तीसाठी अहोरात्र मेहनत करणारे कमी असतात. त्यापैकी राणे हे आहेत,'' असे फडणवीस म्हणाले होते. ही स्तुती सूचक असून राणेंना भाजपमध्ये चांगले स्थान मिळण्यासाठी पोषक असल्याचे बोलले जात आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळात विस्तार येत्या काही दिवसात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर होण्याची शक्यता आहे.या केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात प्रामुख्याने भाजपा पश्चिम बंगाल मधील काही नेत्यांनी मंत्रीपद दिल जाऊ शकते. त्याचप्रमाणे बिहार निवडणुकीत नितीश कुमार यांना शब्द दिल्याप्रमाणे तेथील काही जणांची देखील वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागेल.
महाराष्ट्राच्या वाट्याला जे मंत्रीपद मिळेल त्यात प्रामुख्याने राज्यसभा खासदार नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रीमंडळात नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. विशेष करून मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेला सामारे जात असताना नारायण राणे यांना शिवसेनेच्या विरोधात पक्षातून राजकीय बळ देण्याची रणनिती आखली जात आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग दौऱ्यात नारायण राणे यांचा आम्ही योग्य तो सन्मान करू असे देखील अमित शहा म्हणाले होते. त्यानुसार राणे यांना मंत्रीपद मिळेल अशी चर्चा सुरु झाली आहे.
Edited By - Amit Golwalkar

