काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पटोले यांचे नाव आघाडीवर

प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुनील केदार, यशोमती ठाकूर आणि राहुल गांधी यांचे विश्वासू राजीव सातव, भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावांची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप आणि चरणसिंग सप्रा या प्रमुख नेत्यांबरोबर याबाबत चर्चा केली होती
Nana Patole
Nana Patole

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांचे नांव आघाडीवर आहे. काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल अतिशय वेगाने सुरू आहेत. महाराष्ट्रात प्रदेशध्यक्ष बदलाच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जागी नाना पटोले यांच्या नांवाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

या पदासाठी राज्यसभा खासदार राजीव सातव तसेच राज्यातील मंत्री विजय वडेट्टीवार यांचेही नाव आहे. मात्र गुजरात विधानसभा निवडणुका लक्षात घेता तिथले प्रभारी असलेले राजीव सातव हे राज्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून येण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते. तर काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झालेल्या संध्या सव्वालाखे या तेली समाजाच्या असल्याने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी तेली समाजाचे असलेले वडेट्टीवार येण्याची शक्यताही मावळली आहे. त्यामुळे राज्यात प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचेच नाव आघाडीवर आहे.

प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुनील केदार, यशोमती ठाकूर आणि राहुल गांधी यांचे विश्वासू राजीव सातव, भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावांची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी बाळासाहेब थोरात  पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप आणि चरणसिंग सप्रा या प्रमुख नेत्यांबरोबर याबाबत चर्चा केली होती. पाटील यांनी काँग्रेसच्या आमदारांशीही चर्चा केली होती. त्यावेळी अनेक आमदारांनी बाळासाहेब थोरात यांनाच प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवावे, अशी आग्रही मागणी केली. मात्र, विदर्भातील आमदारांनी पूर्णवेळ अध्यक्ष हवा, अशी भूमिका घेतली होती. 

काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांच्याकडे पत्रकारांनी याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी "पक्षाकडे काहीही मागायचे नाही, हे मी ठरवले आहे. त्यामुळे मी प्रदेशाध्यक्ष होणार, नाही होणार, याबाबत काहीही सांगू शकत नाही. पण पक्षाने ती जबाबदारी दिल्यास निश्चितपणे पार पाडीन, असे सूचक उत्तर त्यांनी दिले होते.  जेव्हा त्यांना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात आले, तेव्हाही यापेक्षा ते प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात होते. पण पक्षाने जबाबदारी दिल्यामुळे ते विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com