Mumbai has better facilities for corona patients than New York: Commissioner Chahal | Sarkarnama

कोरोना रुग्णांसाठी मुंबईत न्यूयॉर्कपेक्षाही दर्जेदार सुविधा : आयुक्त चहल

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

 सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना घरी योग्य सुविधा असल्यास होम क्वारांटाईन केले जाते, अन्यथा अशा व्यक्तींना सीसीसी 2 मध्ये दाखल केले जाते. 

मुंबई : कोरोना  पॉझिटिव्ह रुग्णांचा 24 तासांत अहवाल आणि त्यांना बेड उपलब्ध करण्यात येत आहे. अशा सुविधा जगातील सर्वात श्रीमंत आणि मॉडर्न असलेल्या न्यूयॉर्क पालिकेतही नाहीत, असा दावा पालिका आयुक्त इक्‍बालसिंह चहल यांनी केला आहे. 

कोरोना रुग्णांना बेड आणि आरोग्य सेवा वेळेत मिळाव्यात म्हणून पालिकेने वैशिष्ट्यपूर्ण अशी "चेस दी पेशंट' पॉलिसी सुरू केली आहे. तिच्या माध्यामातून आरोग्य व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी पालिकेने 24 वॉर्डमध्ये वॉर रूम सुरू केले आहेत. वॉर रूमच्या मदतीने त्या त्या परिसरातील रुग्णांना चाचणी अहवाल आणि बेडची व्यवस्था करण्यात येते. 

पालिका कर्मचारी स्वतः रुग्णाच्या घरी जाऊन त्याची भेट घेतात. त्याला बेड मिळवून देतात. इतकेच नाही तर त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयातही नेले जाते, अशी माहिती आयुक्त चहल यांनी दिली. 

रुग्णाला आपल्या घरातून बाहेर पडण्याची आवश्‍यकता नाही. शिवाय त्याला बेडसाठी किंवा रुग्णालयासाठी कुणालाही फोन करायचीही गरज नाही, असेही चहल म्हणाले. न्यूयॉर्क जगातील सर्वात श्रीमंत शहर मानले जाते. मात्र तिथेही मुंबईच्या धर्तीवर कोरोना रुग्णांसाठी सुविधा दिल्या जात नसल्याचा दावा त्यांनी केला. 

असा साधल जातो संवाद 
- दिवसभरात संशयित रुग्णांची चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल रात्री बाराच्या आत एपिडेमिक सेलकडे पाठवला जातो. त्यानंतर विभागवार यादी करून तो सकाळी 7.30 पर्यंत त्या त्या विभाग कार्यालयांना पाठवला जातो. त्यानंतर विभाग कार्यालयांतून पॉझिटिव्ह रुग्णासोबत संवाद साधला जातो. 

- रुग्णाला त्याच्या लक्षणांनुसार उपचार दिले जातात. त्याच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींना सीसीसी 1 सेंटरमध्ये क्वारंटाईन केले जाते. त्या व्यक्तींना पालिका स्वतः बसने सेंटरमध्ये घेऊन जाते. 

- अधिक तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांना ऑक्‍सिजनची व्यवस्था असणाऱ्या डीसीएचसी सेंटरमध्ये दाखल केले जाते. तीव्र लक्षणे, इतर व्याधी किंवा श्‍वसनाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना डीसीएच रुग्णालयात दाखल केले जाते. 

रुग्णाला एका क्‍लिकवर माहिती 
पालिकेने प्रत्येक विभागात 10 रुग्णवाहिका आणि 10 मेडिकल टीम तैनात ठेवल्या आहेत. बेडची माहिती सर्वांना मिळावी म्हणून डॅश बोर्डची सुविधा सुरू करण्यात आली आहे. रुग्णांच्या गरजेनुसार रुग्णालयांचा प्राधान्यक्रम ठरवून देण्यात आला आहे. त्यामुळे गरजू रुग्णाला एका क्‍लिकवर सर्व माहिती उपलब्ध होते. त्यामुळे रुग्णाची फरफट थांबली, असा दावाही आयुक्त इक्‍बालसिंह चहल यांनी केला. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख