खासदार विनायक राऊत यांना पहिल्यांदाच नितेश राणे यांची सूचना पटली... - MP Vinayak Raut Welcomes Nitesh Rane's Suggestion | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार विनायक राऊत यांना पहिल्यांदाच नितेश राणे यांची सूचना पटली...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 डिसेंबर 2020

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला देण्यात यावे, अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी केली आहे. या सुचनेचे आम्ही स्वागत करतो, असे शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत

कणकवली :  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला देण्यात यावे, अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी केली आहे. या सुचनेचे आम्ही स्वागत करतो, असे शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत.

"सन्माननिय नारायण राणे साहेब हे मा. बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ हे खासदार राणे साहेबांचा ड्रीम प्रोजेक्‍ट आहे. म्हणूनच या विमानतळाला "स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ" हे नाव दिले पाहिजे असे माझे वैयक्‍तीक मत आहे.'' असे ट्वीट राणे यांनी केले होते. 

या विमानतळाच्या मंजुरीची प्रक्रिया राणे पालकमंत्री असताना झाली. ते या प्रकल्पासाठी आग्रही होते. त्यांच्याच काळात कामही सुरू झाले; मात्र नंतर सत्तासमिकरणे बदलली. राणेंचे विरोधक सत्ताधारी बनले. विमानतळाचे काम सुरूच राहिले. याच्या उद्‌घाटनावरून आतापर्यंत अनेक आरोप प्रत्यारोप झाले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या काळात याचे औपचारीक उद्‌घाटनही झाले होते. हा प्रकल्प केंद्राकडून प्रलंबीत काही परवानग्यांमुळे अडकला होता. आता ही प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. 

या विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नांव द्यावे, अशा मागणीचे ट्वीट नितेश राणे यांनी केले होते. याबाबत राऊत म्हणाले की, राणेंच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. चिपी विमानतळाला ठाकरेंचे नाव देण्याबाबतची भूमिका यापूर्वी स्थानिक शिवसैनिकांनीही मांडली आहे. तसेच बॅ. नाथ पै यांचेही नाव चर्चेत आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे खासदार विनायक राऊत म्हणाले. 

''चिपी विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी शिवसेनेची सर्वच नेतेमंडळी पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात हा विमानतळ वाहतुकीसाठी निश्‍चितच कार्यान्वित होईल. तत्पूर्वी या विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची सूचना भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी मांडली. त्यांच्या या सूचनेचे आम्ही स्वागतच करतो. खरं तर यापूर्वी तेथील स्थानिक शिवसैनिकांनीही अशीच मागणी केली होती. तर बॅ. नाथ पै यांची नात आदिती पै यांनी नाथ पै यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे विमानतळाला कुणाचे नाव द्यायचे याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत,''
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख