खासदार डॉ.श्रीकांत शिंदे तुम्हारा चुक्‍याच ! - MP Dr. Srikant Shinde, you are wrong! | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे तुम्हारा चुक्‍याच !

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार व शिवसेना नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ.श्रीकांत शिंदे तुम्हारा चुक्‍याच! असे म्हणण्याची वेळ एक उल्हासनगर येथील ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप मालवणकर यांच्यावर आली आहे. त्यांनी खासदार शिंदेंकडून कोणत्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. वाचा त्यांच्यात शब्दातील रोखठोक पोस्ट ! 

.कै.साबीर भाई शेख हे कोणी चुकले तर तुम्हारा चुक्‍याच असे अपभ्रंश करून बोलायचे.त्याची आठवण झाली. एका शिवसेना नेत्याच्या खासदार पुत्राला- तुम चुक्‍याच असे ठणकावून सांगण्याची हिंमत कै.बाळासाहेब ठाकरे, कै.आनंद दिघे यांच्या संस्कारांमुळेच माझ्यात आली आहे. सर्वत्र लाळघोट्यांची फौज असताना एक मर्द मावळला तशी हिंमत करीत आहे. मला ओळखणा-यांना याचे आश्‍चर्य वाटणार नाही. हा काही पहिला वाहिला प्रसंग नाही. 

तर मुळ मुद्द्यावर येतो. काल शिवसेना खासदार व पालकमंत्र्यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पप्पू कलानीचे सुपुत्र ओमी कलानीच्या दरबारात हजेरी लावली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना 1986 पासून चा इतिहास ठाऊक नसावा, रमाकांत चव्हाण हत्या प्रकरण ठाऊक नसावे, जातीय दंगली ठाऊक नसाव्यात. साहजिकच आहे, तेव्हा ते बालक अवस्थेत होते. हा रक्तरंजित इतिहास ठाऊक असताना जर ते कलानी महलच्या पाय-यांवर कुर्निसात करायला गेले असतील तर एक शिवसैनिक म्हणून मला त्याची लाज वाटते. 

खासदार या पदाला एक सन्मान आहे.त्याची आब राखली गेली पाहिजे. आणि शिवसेनेच्या खासदाराकडून तर तशी अपेक्षा करणे गैर नाही. नुकत्याच पार पडलेल्या स्थायी समिती सभापती निवडणूकीत ज्याने भाजपला साथ दिली त्याची मनधरणी त्याच्या दरबारात जाऊन करणे लज्जास्पद आहे. सत्ता संपादनासाठी इतकी लाचारी बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना कदापि मान्य होणार नाही. 

एक खासदार म्हणून तुमच्या कडे लाखो लोकांचे प्रतिनिधित्व चालून आले आहे. पालकमंत्री सुपुत्र म्हणून त्यांना मान सन्मान मिळत आहे. शिवसेना सारख्या नोंदणीकृत राज्यस्तरीय विशाल पक्षाचे आपण खासदार आहात. राज्यात आपल्या पक्षाची सत्ता आहे, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. अशा प्रतिष्ठित पक्षाचे (संघटनेचे) आपण प्रतिनिधी आहात. 

असे असताना एका स्थानिक पातळीवरील गटाचे नेतृत्व करणारे, ज्यांच्याकडे वा घरात कोणतेही संवैधानिक पद नाही, त्यांच्या कार्यालयात आपण खासदार या नात्याने जाऊन एमएमआरडीए च्या रस्यांचे निमित्त करून चर्चा करावी हे अयोग्य आहे, हे कोणताही स्वाभिमानी शिवसैनिक सांगेल.परंतू उघडपणे सांगण्याचे धाडस करणार नाही. जे मी करीत आहे. 

आपल्याला राजकीय चर्चा करायचीच होती तर आपण गोल मैदान येथील आपल्या कोट्यावधीच्या अलिशान कार्यालयात त्यांना आमंत्रित केले असते तर ते शिवसेना या सत्ताधारी संघटनेला व आपल्या खासदारकीच्या पदाला शोभून दिसले असते.पण आपण त्यांच्या दरबारात गेलात, ओमी कलानीच्या नेतृत्वाखाली ( तसे त्यांचे समर्थक म्हणतात) मिटींग घेतली, यामुळे आपण शिवसेना व शिवसैनिकांचे अवमूल्यन केले आहे.माझ्या सारख्या असंख्य स्वाभिमानी शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. 

गेल्या विधान सभा निवडणूकीत आपले पिताजी बंडखोरांना इशारा देत असताना आपण बंडखोराला छुपे समर्थन देत होतात. आता आपल्या खासदारकीची दुसरी टर्म आहे.निश्‍चितच आपल्याला राजकीय परिपक्वता आली असेल, तरी आपण हे कृत्य केले याचे आश्‍चर्य वाटते. वडिलांच्या पुण्याईवर केलेले राजकारण अल्पजीवी असते याचे जिवंत उदाहरण माजी खासदार पुत्र व माजी खासदार आनंद परांजपे हे आहेत. 

आपण स्वाभिमानी शिवसैनिकांना विश्वासात घेऊन राजकारण केले तरच तुमचा राजकीय प्रभाव वाढेल, लाळघोट्या व जी हुजूरी करणा-यांच्या नादी लागलात तर असे दरबारात हजेरी लावण्याचे दुर्धर प्रसंग वारंवार येतील. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख