राठोडांवर कारवाईची धमक नसणाऱ्यांच्या डोळ्यात 'मराठी भाषा दिवस' का खुपतो?  - MNS's Ameya Khopkar criticizes the state government for denying permission for Marathi Language Day program | Politics Marathi News - Sarkarnama

राठोडांवर कारवाईची धमक नसणाऱ्यांच्या डोळ्यात 'मराठी भाषा दिवस' का खुपतो? 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

सरकारला कार्यक्रम करणार असल्याचे आव्हान दिले आहे. 

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्त मुंबईत शिवाजी पार्क येथे "मराठी स्वाक्षरी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, वाढत्या कोविड रुग्णांचे कारण देत राज्य सरकारने मनसेच्या या कार्यक्रमास परवानगी नाकारली आहे. यावरून मनसेचे नेते महाविकास आघाडी सरकारवर कडाडून हल्ला चढवत आहेत. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी "हे सरकारच अमराठी आहे की काय?' अशी शंका घेत सरकारला कार्यक्रम करणार असल्याचे आव्हान दिले आहे. 

"या सरकारला अमराठी का म्हणून नये?' असा प्रश्‍नच अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटमध्ये विचारला आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, "कोविडचा प्रसार होऊ नये, यासाठी सरकारने जी नियमावली आखून दिलेली आहे. त्या नियमांचं काटेकोर पालन करून मनसेने "मराठी भाषा दिन' कार्यक्रम आयोजित केला होता. सरकारने या कार्यक्रमाला कोविड प्रसाराचं कारण देत परवानगी तर नाकारलीच. शिवाय वर कारवाईचा धाकही दाखवला,' असे खोपकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

"ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत, अशा संजय राठोड यांच्यासारख्या मंत्र्यांचे समर्थक लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन करतात. अशा गर्दीवर कारवाई करण्याची ज्यांच्यात धमक नाही, त्यांच्या डोळ्यात "मराठी भाषा दिवस' का खुपतो? महाबिघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर नाही, यावर यामुळे शिक्कामोर्तबच झालं आहे. पण, त्यापुढे जाऊन आता शंका यायला लागली आहे की हे सरकारच "अमराठी' आहे की काय? आम्ही हे ठणकावून सांगतो की नियोजित कार्यक्रम आम्ही सर्व नियम पाळून करणार म्हणजे करणाच,' असे खुलं आव्हान खोपकर यांनी ट्‌विटमधून राज्य सरकारला दिले आहे. 

दरम्यान, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही सरकारला खुले आव्हान दिले आहे. अमेय खोपकर यांचे ट्‌विट रिट्‌विट करत हिम्मत असेल तर अमेय खोपकर यांना अटक करून दाखवाच, असे देशपांडे यांनी म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख