वीज बिलांबाबत मनसे म्हणते....लाथोंके भूत बातोंसे नही मानते! - MNS To Take Strong Stand Against Electricity Bills Recovery | Politics Marathi News - Sarkarnama

वीज बिलांबाबत मनसे म्हणते....लाथोंके भूत बातोंसे नही मानते!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

दोन दिवसांपूर्वी अचानक यू टर्न करत या बिलांच्या वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत.  ग्राहकांना वीज बिलांमध्ये कुठलाही दिलासा मिळणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यावरुन भाजप, मनसे, स्वाभीमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी असे सर्वच पक्ष आक्रमक झाले आहेत

मुंबई : ''वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण"लाथो के भूत बातों से नही मानते", अशी आक्रमक भूमीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी घेतली आहे. 

राज्यातल्या वीज ग्राहकांना लाॅकडाऊनच्या काळातली भरमसाठ बिले आली आहेत. याबाबत सरकार दिलासा देईल असे आश्वासन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी अचानक यू टर्न करत या बिलांच्या वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत.  ग्राहकांना वीज बिलांमध्ये कुठलाही दिलासा मिळणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यावरुन भाजप, मनसे, स्वाभीमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी असे सर्वच पक्ष आक्रमक झाले आहेत. 

दरम्यान, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यात वीज बिलांबाबत पुढे काय पाऊल उचलायचे याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्या अगोदर संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत मनसेची पुढील भूमीका सुचीत केली आहे.

दुसरीकडे वाढीव वीजबिलांबाबत निर्णय घेण्यासाठी सत्तारुढ तसेच विरोधकांच्या लोकप्रतिनिधींची संयुक्त समिती नेमावी, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. अन्यथा वीजग्राहक मेळावे होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.  या प्रश्नावर राज्य सरकार आणि उर्जामंत्री गेले चार महिने आश्वासने देऊन टोलवाटोलवी करत आहे. त्यामुळे आधीच कोरोनाने नाडलेल्या ग्राहकांना सर्वप्रथम दिलासा द्या, असेही दरेकर यांनी सांगितले आहे. 

लॉकडाउनच्या काळातील घरगुती वीज बिले कदापि भरणार नाही, सरकारने सक्तीने वसूल केल्यास तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. नुकतेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घरगुती वीज बिले वसूल केले जाईल, असे वक्तव्य केले होते. त्याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले, वीज बिले वसूल करणार, ही काय गोड बातमी आहे काय?  नितीन राऊत यांना जर कोणतेही अधिकार नसतील तर पोकळ घोषणा करू नयेत, या अगोदर त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारून मगच घोषणा करावी. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख