पोलिसांना वाढदिवसाची सुटी द्या - आमदार दिलीप लांडेंची मागणी - MLA Dilip Lande Demands Birthday Holiday for Policemen | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पोलिसांना वाढदिवसाची सुटी द्या - आमदार दिलीप लांडेंची मागणी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

स्वतःची तसेच आपल्या कुटुंबाची पर्वा न करता सणासुदीच्या दिवशीही प्रसंगी चोवीस तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हक्काची रजा द्यावी, अशी मागणी चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मुंबई  : स्वतःची तसेच आपल्या कुटुंबाची पर्वा न करता सणासुदीच्या दिवशीही प्रसंगी चोवीस तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हक्काची रजा द्यावी, अशी मागणी चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.  यासंदर्भात त्यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना वरील मागणीचे पत्र दिले आहे. 

राज्यातील नागरिक सणासुदीला आपल्या घरात मुलाबाळांसह असतात. मात्र नेमक्या त्याच दिवशी पोलिसांनी कर्तव्यावर हजर रहावे लागते. या पोलिसांच्याच भरोशावर आपण सर्व नागरिक रात्री शांतपणे झोप घेत असल्याने त्यांच्या सेवेची पावती म्हणून त्यांना वरील सवलत द्यावी, असे लांडे यांचे म्हणणे आहे. 

पोलिस दलात अपुरे मनुष्यबळ आहे तसेच कामाची वेळही अनियमित आहे. तरीही पोलिस कर्मचारी व अधिकारी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सतत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करतात. अत्यावश्यक सेवा असल्याने त्यांना सणासुदीच्या रजा नसतात. रजा घेतली तरी ऐनवेळी तातडीचा प्रसंग उद्भवल्यास कधी रजा रद्द होऊन कामावर यावे लागेल याचा भरवसा नसतो. कर्तव्यावर असताना सोयींचीही वानवाच असते, जेवण-खाण, विश्रांती यांचाही नेम नसतो. रस्त्यावर बंदोबस्त करताना स्वच्छतागृहाचीही व्यवस्था नसतेच, याचा मोठा फटका महिला पोलिसांना बसतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या पाठीवर मायेचा हात फिरविण्याची गरज असल्याचे लांडे यांनी पत्रात म्हटले आहे. 

बंदोबस्तात गुंतलेल्या पोलिसांवर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा, सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रम, निवडणूका, प्रशासकीय कामे, अनपेक्षित घटना, नैसर्गिक आपत्तीमधील बचावकार्य यामुळे कामाचा अधिकचा ताण पडतो. कामाची वेळ अनिश्चित असल्याने त्यांना त्यांच्या कुटुंबियांना वेळ देता येत नाही. त्यामुळे त्यांना सण आणि घरातील इतर आनंदाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहता येत नाही. परिणामी त्यांच्या कुटुंबियांमध्ये तणाव निर्माण होऊन कामकाजावर परिणाम होऊ शकतो.
 
तरी पोलीस दलातील कर्मचारी, शिपाई ते अधिकाऱ्यांना किमान त्यांचा वाढदिवस त्यांच्या कुटुंबियांसोबत साजरा करण्यासाठी 'एक दिवस सुट्टी' देण्यात यावी. ज्यामुळे पोलीस बांधव आपला वाढदिवस कुटुंबियांसोबत आनंदाने साजरा करीत तणावमुक्त होऊन नव्या जोमाने व उत्साहाने काम करतील, असे आमदार दिलीप लांडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख