Milk powder will be given free to tribal children and women: Uddhav Thackeray | Sarkarnama

दूध भुकटी आदिवासी मुले, महिलांना मोफत देणार : उद्धव ठाकरे 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

ही योजना पुढे एक वर्ष राबविण्यात येणार असून 121 कोटी उत्पादन खर्च आला आहे.

मुंबई : "" दूध भुकटी ही पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील 6 लाख 51 हजार मुलांना आणि 1 लाख 21 हजार गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला 

ही योजना पुढे एक वर्ष राबविण्यात येणार असून 121 कोटी उत्पादन खर्च आला आहे. भुकटीचा प्रती किलो उत्पादन खर्च 246 रुपये 70 पैसे इतका आहे. दूध भुकटीत प्रोटीनचे प्रमाण 34 टक्के आहे आणि या कोविड काळात पोषणासाठी ती उपयुक्त असल्याने त्याचा अधिक लाभ होईल यामुळे हा निर्णय घेण्यात आला. 

राज्य शासनाने लॉकडाऊन परिस्थितीत एप्रिल ते जुलै या कालवधीत 5 कोटी 94 लाख 73 हजार 606 लिटर दुध शेतकऱ्यांकडून घेतले. तर 49,27,702 मेट्रिक टन दूध भुकटीचे उत्पादन केले. तसेच 25,75,171 मेट्रिक टन बटरचेही उत्पादन केले अशी माहिती बैठकीत देण्यात आली. ही भुकटी आणि बटर हे वखार महामंडळाच्या शीतगृहांमध्ये ठेवण्यात आले आहे. 

एकूण 7 दूध भुकटी प्रकल्पधारक आणि 37 सहकारी संघ आणि 11 शासकीय दूध योजना या योजनेत आहेत. महानंदने ही योजना राबविली. दुधाचा खरेदी दर हा 22 रुपये 10 पैसे ते 27 रुपये प्रती लिटर असा होता, त्यामुळे शेतकऱ्यांचे कमी नुकसान झाले 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे दुध भुकटीच्या बाबतीत खासदारांमार्फत पाठपुरावा करावा अशीही सूचना केली तसेच या संदर्भात एक पत्रही केंद्राला पाठविण्यात येत आहे असे ते म्हणाले. 

या बैठकीस दुग्धविकास मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, त्याचप्रमाणे राज्यमंत्री बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, दुग्धविकास प्रधान सचिव अनुप कुमार, महिला व बालकल्याण सचिव आय. ए. कुंदन, आदिवासी विकास सचिव विनिता सिंघल, महानंदचे प्रतिनिधी उपस्थित होते.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख