मेट्रो कारशेड आता कांजूरला होणार : मुख्यमंत्र्यांची घोषणा - Metro Car Shed will be erected at Kanjur Informs Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

मेट्रो कारशेड आता कांजूरला होणार : मुख्यमंत्र्यांची घोषणा

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

आरेमध्ये जी कारशेड होणार होती ती आता कांजूरला होणार आहे. कांजूरची जागा शून्य रुपये किंमतीने मेट्रो कारशेडसाठी दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली

मुंबई : मुंबई मेट्रोच्या कार शेडसाठी आरेची जागा घेण्याचा निर्णय शासनाने रद्द केली असून आता कांजूर येथे ही कारशेड होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ही संपूर्ण जागा एकही रुपया न आकारता मेट्रोला देण्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

गोरेगाव येथील आरेची जागा मेट्रोच्या कारशेडसाठी देण्याचा निर्णय पूर्वीच्या सरकारने घेतला होता. या कारशेडसाठी वृक्षतोड करण्यास सुरुवात झाली होती. त्याला पर्यावरण प्रेमींनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. शिवसेना व सध्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या आंदोलनात उतरले होते. त्यावेळी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहितीही ठाकरे यांनी दिली. 

ठाकरे यांनी आज समाजमाध्यमांवरुन राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी ही माहिती दिली. आरेमध्ये सहाशे एकरचे जंगल घोषित केले आहे. शहरांची जंगले होतात पण शहरात जंगल असणे ही गोष्ट मोठी आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, '' आरे कार शेडचा मुद्दा ऐरणीवर आला होता. तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो. आम्ही विरोध केला. अनेक पर्यावरणवादी ज्यांचे जीवसृष्टीवर प्रेम आहे. रातोरात झाडे कापली गेली. सत्याग्रहींवर गुन्हे दाखल झाले. त्यांचे सर्व गुन्हे सरकार मागे घेते आहे. आरेमध्ये जवळपास सहाशे एकरची जागा जंगल घोषीत केले आहे. तेथील आदिवासी पाडे, तबेले कुणाच्याही अधिकारांवर गदा येऊ न देता घोषीत केले. या जंगलाची व्याप्ती ८०० एकर झाली आहे,''

नव्या जागेबाबत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, "आरेमध्ये जी कारशेड होणार होती ती आता कांजूरला होणार आहे. कांजूरची जागा शून्य रुपये किंमतीने मेट्रो कारशेडसाठी दिली आहे. ही सरकारी जमीन आहे. आरेमध्ये काही बांधकाम झाले आहे. सुमारे शंभर कोटींचा जो खर्च झाला होता तो ही योग्य वापरातून वसूल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तिथे जी इमारत बांधली गेली आहे, इमारत चांगल्या कामासाठी वापरणार आहोत. तीन व सहा नंबरच्या मेट्रोसाठी खर्च झालेला पैसा उपयोगात आणणार आहोत. एकही पैसा वाया जाऊ देणार नाही,'' 

आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सुनील केदार यांचे आभार मानले. अधिकाऱ्यांनीही यासाठी मनापासून मदत केल्याचे ठाकरे यांनी सांगितले. जंगल आहे ते कापायचे आणि काही कोटी झाडे लावायच्या थापा मारायच्या हे मला जमत नाही, असा टोलाही त्यांनी भाजपचे नांव न घेता लगावला.

अवकाळी पाऊस आणि निसर्ग वादळ यामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचे सांगत ठाकरे म्हणाले, "कोकणात निसर्ग चक्रीवादळ आले. पूर्व विदर्भात पूरस्थिती गंभीर होती. कोकणात बऱ्याबैकी मदत देऊन झाली आहे. पूरस्थितीचे सर्व पंचनामे झाले आहेत. सांगली कोल्हापूरप्रमाणे पूरस्थितीत नुकसान भरपाई देतो आहोत. आताही जिथे नुकसान होते आहे तिथे पंचनाम्यांचे आदेश दिले आहेत,'' 

''आम्ही साडे एकोणतीस लाख शेतकऱ्याचे पीक कर्ज माफ जे विकेल ते पिकेल अशी आपण घोषणा केली होती. केले. पण हे चक्र सुरुच राहते. कांद्याच्या साठवणुकीसाठी आपण महाओनियन सुरु केले, कांद्याच्या साठवणुकीसाठी. तशीच शीतगृहे, गोदामे दिली जातील.  केंद्राने कृषी कायदा केला. त्यातले शेतकऱ्यांच्या हिताचे काय आणि घातक काय याचा विचार केला. शेतकरी संघटनांशी चर्चा केली. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे करु. सर्व संघटनांशी बोलतो आहोत. काही आक्षेप आहेत. हे सर्व समजून घेऊन त्याबाबत निर्णय घेणार,'' असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख