Marathon interview of Uddhav Thackeray after Sharad Pawar in Shiv Sena's mouthpiece! | Sarkarnama

शिवसेनेच्या मुखपत्रात शरद पवारांपाठोपाठ आता उद्धव ठाकरेंची मॅरेथॉन मुलाखत ! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 20 जुलै 2020

कोरोनाचे संकट विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला लक्ष्य करणे तसेच राज्यात नव्याने जुळलेली समिकरणे याबाबत ठाकरे काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापाठोपाठ आता मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांची मुलाखत सामनात झळकणार आहे.तशी घोषणा खासदार आणि पत्रकार संजय राऊत यांनी आज केली. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मॅरेथॉन मुलाखती सामनात नेहमीच येत असत. मात्र राज्यात शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यानंतर या दोन्ही नेत्यांच्या पंक्तीत शरद पवार हे ही आले. सामनात कधी नव्हे ती मॅरेथॉन मुलाखत नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.

राऊत यांच्या बिनधास्त आणि बेधडक प्रश्‍नांना श्री. पवार यांनीही तशीच उत्तरे दिली होती. श्री. पवार यांच्या या मुलाखतीची राजकारणात जोरदार चर्चा झाली आहे. आता श्री, पवार यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांची मुलाखतही प्रसिद्ध होणार आहे. 

संजय राऊत यांनी यासंदर्भात ट्‌विट केले असून त्या ट्‌विटमध्ये त्यांनी म्हटले आहे, की उद्धव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत सामना साठी घेतली. 
सर्वच प्रश्नांना दिलखुलास ऊत्तरे मिळाली..उद्वव ठाकरे यांची दिलकी बात राजकारण ढवळून काढेल. करोना पासून राम मंदिरा पर्यंत मुख्यमंत्री ठाकरे दणक्‍यात बोलले.. मुलाखत 25 26 जुलै रोजी वाचता पहाता येईल. 

कोरोनाचे संकट, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला लक्ष्य करणे तसेच राज्यात नव्याने जुळलेली समिकरणे याबाबत ठाकरे काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

कोरोनाचे संकट असतानाही मुख्यमंत्री ठाकरे हे मातोश्रीबाहेर पडत नाहीत असा आरोपही त्यांच्यावर केला जातो. तसेच तीन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत. आम्ही हे सरकार पाडणार नाही तर ते आपल्या कर्माने कोसळेल असा दावा फडणवीस यांच्याकडून केला जात आहे. या सर्व प्रश्‍नांना ठाकरे हे उत्तर देण्याची शक्‍यता आहे. 

शिवाजी पार्कचाही गणेशोत्सव रद्द
 गेल्या 48 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या दादर, शिवाजी पार्क येथील केळुस्कर मार्गावरील शिवाजी पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाच्या गणेशोत्सवासाठी भाविकांची दरवर्षी मोठी गर्दी होते.

यंदा कोव्हिडच्या साथीमुळे राज्य सरकारने उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याची मंडळांना परवानगी दिली आहे. त्यासाठी नियमावलीही तयार केली आहे; मात्र मंडळाने यापुढे जात सामाजिक जबाबदारीचे भान जपत गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रसिद्ध लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यापूर्वी उत्सव साजरा न करता आरोग्यविषयक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे; तर महापालिकेच्या के पश्‍चिम विभाग कार्यालयाने "एक प्रभाग एक गणपती' संकल्पना राबविण्याचे व गणेशोत्सव मंडळांना आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख