राष्ट्रवादी आणि शिवसेनेत भाजपमधून इनकमिंग होणार  - Many Leaders in Bhayander may Return to NCP | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादी आणि शिवसेनेत भाजपमधून इनकमिंग होणार 

संदीप पंडित
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसमधून सेना-भाजपमध्ये गेलेले नेते आता पुन्हा स्वगृही परतण्याचे संकेत मिळू लागले आहेत. यासंदर्भात भेटीगाठी सुरू असून उघडपणे कोणीही काहीही बोलत असले तरी लौकरच येथील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

भाईंदर : मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसमधून सेना-भाजपमध्ये गेलेले नेते आता पुन्हा स्वगृही परतण्याचे संकेत मिळू लागले आहेत. यासंदर्भात भेटीगाठी सुरू असून उघडपणे कोणीही काहीही बोलत नसले तरी लौकरच येथील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

मीरा भाईंदर हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि या किल्याचे किल्लेदार होते ते गिलबर्ट मेंडोसा. परंतु मधल्या काळात राष्ट्रवादीला घरघर लागली आणि होत्याचे नव्हते झाले. पहिल्यांदा गिलबर्ट मेंडोसा यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि ते शिवसेनेत दाखल झाले, तर त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपला जवळ केले. परंतु आता राज्यात सत्तांतर झाल्यावर, आधी उडालेल्या चिमण्या पुन्हा एकदा आपल्या घरट्याकडे परत येण्याचे संकेत मिळत असून त्यामुळे भाईंदरचे राजकारण पुन्हा एकदा बदलणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. 

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तारू फुटले आणि जवळपास दोन दशके येथे राज्य करणाऱ्या या पक्षाला घरघर लागली. याठिकाणचे राष्ट्रवादीचे तारणहार गिलबर्ट मेंडोसा यांनी शिवसेनेतून उमेदवारी मिळविली. पण त्यांना भाजपचे नरेंद्र मेहता यांनी टक्कर देत चारी मुंड्या चित करत आमदारकी मिळविली. त्या वेळी मेंडोसा यांच्या इतर सहकार्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले.

परंतु आता पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्याने राष्ट्रवादी मधून उडून गेलेले पक्षी पुन्हा घरट्याकडे येण्याची तयारी करत आहेत. यामध्ये गिलबर्ट मेंडोसा यांचे एकेकाळचे उजवे हात राहिलेले अॅड. रवी व्यास आणि सहकारी पुन्हा एकदा मेंडोसाकडे परत येत आहेत. मात्र ते शिवसेनेत जाणार की वेगळा गट बनवून येणारी महापालिका निवडणूक लढविणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.

तर मेंडोसाचे इतर साथीदार जे भाजपमध्ये गेले होते ते पुनः एकदा राष्ट्रवादीकडे येऊ लागले आहेत. यात राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष मोहन पाटील, जयंत पाटील, शांताराम ठाकूर, माजी महापौर निर्मला सावळे, अंकुश मालुसरे यांच्या सारख्या दिग्गजांचा समावेश आहे. त्यांनी नुकतीच मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतल्याने येथील राष्टवादीला पुन्हा सुगीचे दिवस येणार असल्याचे बोलले जात आहे. लौकरच बरेच नेते आपले पत्ते खुले करतील असेही दिसते आहे.

आम्ही जितेंद्र आव्हाड साहेबांना भेटलो हे खरे आहे. पण आमची भेट ही आगरी भवनासाठी होती. यावेळी आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही - जयंत पाटील, माजी उपमहापौर आणि माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, भाईंदर.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख