चिपळूण पालिकेत उपनगराध्यक्षपद ताब्यात घेण्याच्या महाविकास आघाडीच्या हालचाली - Mahavikas Aghadi Trying to Snatch Deputy Chairman Post in Chiplun | Politics Marathi News - Sarkarnama

चिपळूण पालिकेत उपनगराध्यक्षपद ताब्यात घेण्याच्या महाविकास आघाडीच्या हालचाली

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

भाजपकडील नगराध्यक्षपद काढून घेण्यासाठी महाविकास आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. आता उपनगराध्यक्षपद मिळवण्यासाठी अविश्‍वास ठरावाच्या हालचाली सुरू आहेत. चिपळूण पालिकेत अल्पमतात असलेल्या भाजपकडे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष अशी दोन महत्त्वाची पदे आहेत

चिपळूण : भाजपकडील नगराध्यक्षपद काढून घेण्यासाठी महाविकास आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. आता उपनगराध्यक्षपद मिळवण्यासाठी अविश्‍वास ठरावाच्या हालचाली सुरू आहेत. चिपळूण पालिकेत अल्पमतात असलेल्या भाजपकडे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष अशी दोन महत्त्वाची पदे आहेत.

राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीची महाविकास आघाडी स्थापन झाली. त्याचे पडसाद चिपळूण पालिकेतही उमटले. शिवसेना, कॉंग्रेस आणि भाजपने एकत्र येऊन पालिकेतील विषय समित्यांवर वर्चस्व मिळवले. तरीही नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष अशी दोन महत्त्वाची पदे भाजपकडेच राहिली. विषय समित्यांच्या माध्यमातून किरकोळ कामे करत तिन्ही पक्षाचे नगरसेवक शहरात पक्ष मजबुतीकरणासाठी प्रयत्न करत असले तरी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपद भाजपकडे असल्यामुळे महाविकास आघाडीचा शहरात प्रभाव पडत नाही. पालिका निवडणुकीसाठी वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. नगराध्यक्ष पदाबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय देतील, हे प्रशासनाकडून सादर होणाऱ्या कागदपत्रांवर अवलंबून आहे.

भाजपचे निशिकांत भोजने यांच्याकडे गेली चार वर्षे शहराचे उपनगराध्यक्षपद आहे. त्यांनी राजीनामा दिला किंवा महाविकास आघाडीने त्यांच्यावर अविश्‍वास ठराव मांडला तरच हे पद महाविकास आघाडीकडे जाईल. मध्यंतरी इतरांना संधी देण्यासाठी भोजने यांना उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची सूचना पक्षाकडून केली होती. तेव्हा नगराध्यक्ष पदाप्रमाणेच उपनगराध्यक्षपदाचा कालावधी ठरलेला नाही, असे सांगत भोजने यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे आताही भोजने राजीनामा देण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे हे पद मिळवण्यासाठी महाविकास आघाडीला भोजने यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव मांडावा लागणार आहे. त्याची तयारी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुरू आहे.

नगराध्यक्षांना दोषी ठरवले तर..
महाविकास आघाडीच्या तक्रारीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना दोषी ठरवले तर प्रशासनही अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत प्रशासन आणि नगराध्यक्ष यांचे पारडे जड असल्याचे दिसते. त्यामुळेच उपनगराध्यक्षपद आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून हालचाली सुरू आहेत.

आम्हाला पालिकेची सत्ता, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष या पदांमध्ये अजिबात इच्छा नाही. जनतेच्या पैशाचा गैरवापर होऊन विकासाच्या नावाखाली कोणी मलिदा खाता कामा नये. यासाठी आमची धडपड सुरू आहे. महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांना विश्‍वासात घेऊन लवकच उपनगराध्यक्षपदाबाबत निर्णय घेऊ.
-उमेश सकपाळ, गटनेता शिवसेना, चिपळूण

Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख