दिलासादायक बातमी : महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला 'ब्रेक'...केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण - Maharashtra showing signs of plateauing in daily corona cases | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

दिलासादायक बातमी : महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला 'ब्रेक'...केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था
सोमवार, 3 मे 2021

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी आहे. मागील काही दिवसांत महाराष्ट्रातील कोरोनाच्या नवी रुग्णवाढीला ब्रेक लागला आहे. रुग्णसंख्येने आता टोक गाठले असून ती आता त्यापुढे जाताना दिसत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही महाराष्ट्रातील दुसऱ्या लाटेला ब्रेक लागल्याचे संकेत दिले आहेत.

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून 60 ते 65 हजारांच्या जवळपास नवीन रुग्ण आढळून येत आहेत. हा आकडा याचदरम्यान स्थित राहिल्याचे दिसत आहे. केंद्रीय आयोग्य मंत्रालयानेही याबाबत संकेत दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सह सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ, झारखंड या राज्यांमध्ये कोरोनाचे दैनंदिन रुग्ण कमी होत आहेत. हे सुरूवातीचे संकेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अगरवाल यांनी इतर काही राज्यांमध्ये वाढत असलेल्या रुग्णांबाबतही चिंता व्यक्त केली. आंध्र प्रदेश, अरूणाचल प्रदेश, आसाम, बिहार, चंदीगढ, गोवा, हरयाणा आदी राज्यांमध्ये नवीन रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. या राज्यांनी खबरदारी घेण्याची गरज असल्याचेही अगरवाल यांनी सांगितले. देशातील बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. आज हे प्रमाण 82 टक्क्यांवर पोहचले आहे, असे अगरवाल यांनी सांगितले. काही अभ्यासांमध्येही महाराष्ट्रातील लाट मे महिन्यातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून ओसरण्यास सुरूवात होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनही तसे संकेत मिळत आहेत. 

दरम्यान, महाराष्ट्रातील रुग्णसंख्या कमी होत असल्याने काहीसा दिलासा मिळू लागला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढू लागले असून राज्यातील रिकव्हरी रेट सध्या 84 टक्क्यांच्या पुढे आहे. त्याचप्रमाणे एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाणही दीड टक्क्यांच्या खाली आहे. राज्याच्या पॅाझिटिव्हिटी रेट म्हणजे एकूण चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 17 टक्क्यांच्या पुढे आहे. 

महाराष्ट्रातील मागील काही दिवसांत आढळून आलेले नवे रुग्ण
दिवस        नवे रुग्ण

2 मे         56,647
1 मे         63,282
30 एप्रिल         62,919
29 एप्रिल         66,159
28 एप्रिल         63,309
27 एप्रिल         66,358
26 एप्रिल         48,700
25 एप्रिल         66,191
24 एप्रिल         67,160
23 एप्रिल         66,836
 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख