maharashtra government again transfers nine deputy commissioners of police | Sarkarnama

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीपुराणाचा अध्याय अखेर संपला

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 10 जुलै 2020

मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील विसंवाद समोर आला होता. यावर अखेर पडदा पडला आहे. 

मुंबई : मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदलीवरून राज्यात राजकीय वातावरण तापले होते. अखेर वातावरण निवळले असून, आता पुन्हा त्याच अधिकाऱ्यांच्या किरकोळ फरकाने पुन्हा बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश शुक्रवारी पोलिस आयुक्त (प्रशासन) यांनी काढले असून, नऊ उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यंदा पोलिस दलात कोणत्याही प्रकारच्या बदल्या करण्यात येणार नसल्याचे सरकारने म्हटले होते. त्यातच मुंबईत कोरोनाचा कहर वाढत आहे. अनेक ठिकाणी पोलिसांनी अनावश्‍यकरीत्या बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करुन त्यांना अटकाव करावा लागत आहे. अशा काळात गेल्या आठवड्यात दहा पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या होत्या; तर दोन उपायुक्तांना प्रतिनियुक्तीवर दिल्लीत पाठविले होते. 

काही अधिकाऱ्यांनी बदली आदेशानंतर नवीन ठिकाणी पदभार स्वीकारला होता; तर काही अधिकारी नाराज असल्याने त्यांनी पदभार स्वीकारलेला नव्हता. त्यानंतर सरकारने रविवारी या सर्व बदल्या रद्द झाल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री व गृहमंत्री कार्यालयांना विश्‍वासात न घेता बदल्या केल्यामुळे त्या रद्द केल्याचे सरकारच्या वतीने जाहीर केले होते, पण प्रत्यक्षात यामागे राजकीय मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली होती. सरकारने सर्व पोलिस उपायुक्तांना पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी पदभार स्वीकारण्यास सांगितले होते. 

रविवारी रद्द झालेल्या या बदल्यानंतर पाच दिवसांनी शुक्रवारी पुन्हा मुंबई पोलिस दलातील उपायुक्तांच्या बदलीची नवी यादी जाहीर करण्यात आली. त्यात नऊ उपायुक्तांची बदली करण्यात आली आहे. याचबरोबर उपायुक्त (अभियान) हा अतिरिक्त भार विशेष शाखा- 1च्या उपायुक्तांकडे देण्यात आला आहे. तसेच, संरक्षण व सुरक्षा विभागाच्या उपायुक्तांचा अतिरिक्त पदभार उपायुक्त गुन्हे (प्रतिबंध) यांच्याकडे देण्यात आला आहे.

नव्याने करण्यात आलेल्या पोलीस उपायुक्तांच्या बदल्या
उपायुक्त - पूर्वीचे ठिकाण - बदलीचे ठिकाण
परमजीतसिंग दहिया - परिमंडळ 7 - परिमंडळ 3
प्रशांत कदम - संरक्षण - परिमंडळ 7
गणेश शिंदे - विशेष कक्ष 1- बंदर परिमंडळ
डॉ. रश्‍मी करंदीकर - बंदर परिमंडळ - सायबर विभाग
शहाजी उमाप - गुन्हे शाखा - विशेष शाखा 1
डॉ. मोहन दहिकर - परिमंडळ 11 - सशस्त्र पोलिस दल (ताडदेव)
विशाल ठाकूर - सायबर - परिमंडळ 11
प्रणय अशोक - ऑपरेशन - परिमंडळ 5
नंदकुमार ठाकूर - सशस्त्र पोलिस (ताडदेव) - गुन्हे शाखा (अन्वेषण) 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख