राज्यातील लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढला ,शॉपिंग मॉल उघडणार - The lockdown in the state extended to August 31, with shopping malls opening | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यातील लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढला ,शॉपिंग मॉल उघडणार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 30 जुलै 2020

खासगी व्यवस्थापनात 10 टक्के किंवा 10 कर्मचारी यातील जे कमी असेल, तो आकडा सेवेसाठी हजर होण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई : केंद्र सरकारने अनलॉक-3 बद्दल नवीन नियमावली जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. लॉकडाऊन वाढवण्यास घटक पक्षांचा विरोध असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढवण्याची भूमिका कायम ठेवली. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधात निर्णय घेण्यात आला.

पूर्वीच्या आदेशानुसार जीवनावश्‍यक वस्तुंची दुकाने उघडी रहातील. तर मॉलही सकाळी 9 पासून रात्री 7 पर्यंत खुले रहाणार आहेत. मात्र सिनेमा हॉल बंद रहातील. सरकारच्या अंत्रगत येणाऱ्या अत्यावश्‍यक सेवा सोडून अन्य विभाग 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या जोरावर काम करेल.

खासगी व्यवस्थापनात 10 टक्के किंवा 10 कर्मचारी यातील जे कमी असेल, तो आकडा सेवेसाठी हजर होण्याची परवानगी देण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्थेसंबंधी नियम निश्‍चित करण्यात आले असून, ते पूर्वीप्रमाणेच असतील. 

प्रधानमंत्री पीक विमायोजना, 31 जुलै अंतिम मुदत

खरीप हंगामासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आलेली असून योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत खरीप हंगामासाठी दि. 31 जुलै 2020 असून शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी बॅंक तसेच आपले सरकार सेवा केंद्र यांचे मार्फत विमा अर्ज स्विकारण्यात येत आहेत. शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी गर्दी झाल्यास अंतिम मुदतीच्या पुर्वी ऑनलाईन अर्ज भरता न आल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार नाही. 

योजनेत सहभागी होण्याची अंतीम मुदत वाढविणे केंद्र शासनाच्या योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अशक्‍य असल्याने अशा स्वरुपाच्या कोणत्याही चर्चेवर विश्वास न ठेवता नोंदणीसाठी नजीकच्या बॅंक अथवा आपले सरकार केंद्रामध्ये दिनांक 31 जुलैपर्यंत विमा हप्त्यासह आणि आवश्‍यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी केले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख