सरनाईक यांचे पत्र CM कार्यालयातून बाहेर येणे म्हणजे शिवसेनेचा दोन्ही काॅंग्रेसला चकवा?

महाविकास आघाडीत तणाव वाढणार की कमी होणार?
uddhav mantarlay
uddhav mantarlay

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Letterbomb by Shivsena MLA Pratap Sarnaik) यांनी लिहिलेले ‘ते‘ पत्र मुख्यमंत्री कार्यालयातून बाहेर आले असून त्यातील तपशिलाची पूर्वकल्पना शिवसेना नेत्यांना होती, असे विश्वसनीयरीत्या समजते. युती तोडल्याने माझ्यासारख्या नेत्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो, हे पत्रात नमूद करून भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर सरनाईक यांनी दोषारोप केले आहेच, शिवाय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची कामे होत असून ते शिवसेनेला फोडत असल्याचा आरोपही केला आहे. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा हा प्रकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना देऊन झाला असून त्यांची या पत्राला पूर्णत: मान्यता असल्याचे समजते.

८ जून रोजी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेले पत्र आज सही-शिक्क्यानिशी बाहेर आले आहे. हा केवळ योगायोग नसून हे सिलेक्टिव्ह लिक असल्याचे मानले जात आहे. सरनाईक यांच्या मुलाचे लग्न भाजप नेते, माजी मंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मुलीशी झाले आहे. त्यामुळे भाजपशी सलगी वाढवण्याचा सल्ला त्यांच्याकडून येणे महत्त्वाचे मानले जाईल, अशी अटकळ आहे. पुन्हा परत जाऊ या, अशी हाक देतानाच भाजप विरोधकांना त्रास देते, चौकशी मागे लावते हेही पत्रात स्पष्ट लिहिण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागून दिल्लीला जाणे, मतभेद विसरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे स्वत: अभीष्टचिंतन करणे, या दोन दरी सांधण्याच्या घटनांनंतर लगेचच आमदारांना परत जायचे हे पत्र जाहीर चर्चेला आणणे हा स्वत: ठाकरे यांनीच उभा केलेला चकवा तर नव्हे ना, असा प्रश्न केला जात आहे. पंतप्रधानांशी झालेल्या गुफ्तगूमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विचलित झाले आहेत. आज सरनाईक यांच्या पत्रात महाविकास आघाडीतील पक्ष शिवसेनेला त्रास देत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. शिवसेना नेते या पत्राच्या बाहेर येण्याने बुचकळ्यात पडले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातून पत्र बाहेर पडण्याची ठाकरेंच्या काळातील ही पहिलीच घटना आहे.

अटक समोर दिसतेय म्हणून : सोमय्या

प्रताप सरनाईक तसेच पत्रात उल्लेख केलेले रवींद्र वायकर आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या संबंधीची कागदपत्रे जाहीर करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. अटक समोर दिसत असल्याने सरनाईकांनी ही विधाने केली असल्याचे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com