कोविडयोद्धे बेस्ट कामगारांसाठी  मुख्यमंत्र्यांकडे ऑनलाईन पिटीशन - Kovidyoddhe for Best Workers Online petition to the Chief Minister | Politics Marathi News - Sarkarnama

कोविडयोद्धे बेस्ट कामगारांसाठी  मुख्यमंत्र्यांकडे ऑनलाईन पिटीशन

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 ऑगस्ट 2020

कोरोनामुळे आतापर्यंत 107 कर्मचारी मृत्युमुखी पडल्याचा दावाही त्यांनी याचिकेत केला आहे. 

मुंबई : कोरोनाच्या फैलावात स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता काम करणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या अद्यापही मान्य होत नसल्याने याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे ऑनलाईन पिटीशन करण्याचा मार्ग त्यांच्या कामगार संघटनांनी वापरला आहे. 

महापालिका कामगारांचे नेते शशांक राव, बेस्ट एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष व मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस नितीन पाटील आदींच्या पुढाकाराने ही याचिका सादर झाली आहे. बेस्ट कामगारांनी, त्यांच्या कुटुंबियांनी तसेच सामान्य नागरिकांनीही या याचिकेला ऑनलाईन पाठिंबा देण्याचे आवाहन शशांक राव यांनी केले आहे. 

जास्तीत जास्त लोकांचा पाठिंब्याने ही याचिका मुख्यमंत्र्यांकडे गेली तर बेस्ट कामगारांची अवस्था सुधारेल, असे त्यांचे म्हणणे आहे. 

कोरोना रोखण्यासाठी काम करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचविण्याचे काम रेल्वे बंद असताना इतके महिने बेस्टच्या कामगारांनी केले. त्यामुळे बेस्टच्या तेराशे पन्नास कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला, तर 107 जणांचे बळीही गेले. एकाही मृताच्या वारसाला पन्नास लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळाले नाही, ग्रॅच्युइटी वा अन्य देणीही मिळाली नाहीत. 

नव्वद पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये वारसांना नोकरीही मिळाली नाही. कोरोना होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना झाली नाही तसेच कोरोनाग्रस्त कामगारांसाठी उपचारांची व्यवस्थाही नाही. त्यामुळे बाहेर उपचार घेताना त्यांचे हाल होत आहेत.

लॉकडाऊन मध्ये अडकल्यामुळे कामावर येऊ न शकलेल्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले जात आहे, तसेच केंद्र सरकारचे आदेश डावलून पगारकपातही केली जात आहे, असेही शशांक राव यांनी सांगितले आहे. 

वडाळा आगारात बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी कोवीड हॉस्पीटल उभारावे तसेच अन्य डेपोंमध्ये क्वारंटाईन सेंटर उभारावीत, या मागण्या अद्यापही मान्य केल्या नाहीत. गरज नसताना जास्त कर्मचाऱ्यांना आगारात बोलावून ठेवण्यात येते, त्यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही,

यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे. कामगारांवर जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा काँग्रेस पक्ष त्यांच्यामागे उभा राहिला आहे. त्यामुळे आताही मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, अशी मागणी नितीन पाटील यांनी केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख