मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती दडवली आहे, अशी तक्रार काल भाजप नेते डॉ. किरीट सोमैया यांनी प्राप्तीकर विभागाकडे केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती दडवली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती प्रत्यक्ष कागदपत्रांसमोर, करारपत्रांसमोर पडताळणी केली असता हे दिसून येत आहे की, निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती सत्य नाही व माहिती लपवण्याचा प्रयत्न केला आहे, असा सोमय्यांचा आरोप आहे. उद्धव ठाकरे यांनी दडवलेल्या संपत्तीसंदर्भात निवडणूक आयोग दिल्ली येथे तक्रार दाखल केल्यानंतर काल आयकर विभागाच्या इन्व्हेस्टिगेशन विंगच्या महासंचालक भानुमती यांच्याकडे तक्रार दाखल करून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सोमय्यांनी केली आहे.
ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीचे खरेदी मूल्य 4 कोटी 37 लाख दाखवले आहे; पण करारामध्ये बाजारमूल्य 4 कोटी 14 लाख असल्याचे दिसते; परंतु खरेदीमूल्य 2 कोटी 10 लाख असल्याचे दिसून येते, असा सोमय्यांचा आक्षेप आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांनी 19 घरांचा (एकूण 23,500 स्क्वेअर फूट बांधकाम), 8 वर्षांचा (1/4/2013 ते 31/3/2021 पर्यंत) मालमत्ता कर 12 नोव्हेंबर 2020 रोजी भरला. ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार एकूण संपत्तेचे बाजारमूल्य 5 कोटी 29 लाख आहे. अशाप्रकारे उद्धव ठाकरे यांच्याकडे कोर्लाई, अलिबाग येथे 10.50 कोटी रुपयांची जमीन व मालमत्ता आहे; पण संपत्ती-मालमत्तेची किंमत व मूल्य 2.10 कोटी एवढीच दाखवली आहे, असेही सोमय्यांचे म्हणणे आहे.
Edited By - Amit Golwalkar

