केशव उपाध्ये म्हणतात, "" सत्तेसाठी शिवसेनेने रामराज्याचा मार्ग सोडला अन्‌ मोगलाई स्वीकारली !'' - Keshav Upadhye says, "Shiv Sena left the path of Ram Rajya for power and accepted Moghlayi!" | Politics Marathi News - Sarkarnama

केशव उपाध्ये म्हणतात, "" सत्तेसाठी शिवसेनेने रामराज्याचा मार्ग सोडला अन्‌ मोगलाई स्वीकारली !''

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

कोरोना महामारीच्या प्रसाराच्या काळात सर्व नियम, बंधने पाळूनच हा आनंदोत्सव साजरा करण्याच्या सूचना पक्षातर्फे राज्यभरातील कार्यकर्त्यांना देण्यात आल्या होत्या.

मुंबई : "" कॉंग्रेसबरोबर आघाडी केली म्हणून हिंदुत्व सोडले नाही, असे सांगणाऱ्या शिवसेनेचे खरे स्वरूप काल दिसून आले. सत्तेसाठी शिवसेनेने रामराज्याचा मार्ग सोडला आणि मोगलाई स्वीकारली असा आरोप प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज केला. 

अयोध्या येथील श्री राम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त शांततेत आनंदोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर सरकारने कारवाई करून मोगलाईचे दर्शन घडविल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

कोरोना महामारीच्या प्रसाराच्या काळात सर्व नियम, बंधने पाळूनच हा आनंदोत्सव साजरा करण्याच्या सूचना पक्षातर्फे राज्यभरातील कार्यकर्त्यांना देण्यात आल्या होत्या. असे असतानाही पोलिस यंत्रणेने काही ठिकाणी दबावतंत्राचा वापर करून आनंदोत्सव होणारच नाही यासाठी प्रयत्न केले. पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांनी 10 लाख लाडूंचे वाटप करण्याचे ठरवले होते; मात्र पोलिसांनी लाडूवाटप करण्यास प्रतिबंध केला असेही त्यांनी सांगितले. 

अनेक ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमा आणि झेंडे जप्त केले. इंदापूर, बारामती, सासवड येथे कार्यक्रम होऊच दिले नाहीत. विदर्भात अमरावती, बडनेरा, परतवाडा, पुसद, अकोला येथे पोलिसांनी कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रकार घडले. "कार्यक्रम केला तर बघा, गुन्हे दाखल करू' अशी भाषा पोलिसांकडून वापरली गेली. नागपूर येथे बॅनर, झेंडे लावू दिले नाहीत, असे उपाध्ये या वेळी म्हणाले. 

नाशिक येथे काळाराम मंदिर परिसरात अंतर राखण्याचे सर्व नियम पाळून आनंदोत्सव साजरा करण्याची विनंती पोलिसांनी फेटाळून लावली. काळाराम मंदिर परिसरात सर्वत्र बॅरिकेटस लावले गेले. अखेर आमदार देवयानी फरांदे यांनी बंदी हुकूम मोडून रामकुंडावर आरती केली. परभणी येथे पेढेवाटप कार्यक्रम पोलिसांनी बंद पाडला आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

कराड येथे महिला कार्यकर्त्यांना कार्यक्रम करू दिला नाही. अकलूज येथेही कार्यकर्त्यांना पोलिसांकडून दमदाटी केली गेली. झेंडे, पताका लावण्यास प्रतिबंध केला गेला. हे प्रकार पाहिल्यावर आनंदोत्सव साजरा होऊ द्यायचाच नाही, असा सरकारचा छुपा अजेंडा होता, अशी शंका येते असेही ते म्हणाले. नगर जिल्ह्यात पोलिसांनी कहर करून कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, नेवासा, शेवगाव या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख